मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश आंबेडकरांनी दिल्यानंतर काँग्रेस ताळ्यावर आली आहे. वंचितसोबत आघाडी करण्याबाबत दरवाजे पुन्हा खुले केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. “राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वाकडे दिले होते, तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत”, असे ते म्हणाले.
सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राज्य निवडमंडळाची बैठक गुरुवारी दादर येथील टिळक भवनात झाली. त्यांनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, २८ महापालिकांसाठी राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली, जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पक्ष पातळीवर एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. सोशल इंजिनीअरिंग लक्षात घेऊन तिकीट वाटपाची चर्चा करण्यात आली आहे. मविआ व इंडिया आघाडीचा घटक पक्ष नात्याने उबाठाशी चर्चा सुरू आहे. कोणाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.






