युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशीष गिरी यांनी मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि युवक अध्यक्ष विरू वाघमारे उपस्थित होते.
ठाण्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा ओघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष गिरी यांच्यासोबत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपल, जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षिरसागर, गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा आणि अनेक ब्लॉक अध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ॲड. आशीष गिरी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर टीका करत म्हटले की, “काँग्रेसवर नाराजी नसली तरी सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.” प्रवेश केलेल्या सर्वांचे मुल्ला यांनी स्वागत करत, ठाणे शहरात युवकांशी एकत्र येऊन राष्ट्रवादीला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याची शपथ घेतली.






