Friday, December 26, 2025

बविआने देऊ केल्या केवळ आठ जागा, उबाठा आघाडीतून बाहेर

बविआने देऊ केल्या केवळ आठ जागा, उबाठा आघाडीतून बाहेर

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, मनसे आणि उबाठा यांनी आघाडी करण्याची तयारी चालविली होती. या आघाडीत उबाठा गटाला केवळ आठ जागा देण्याचे बविआ नेत्यांनी मान्य केले. त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली असून, या आघाडीतून बाहेर जाण्याचा निर्णय उबाठाच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. वसई - विरार महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यामध्ये महायुती झाली आहे. या महायुतीविरुद्ध लढण्यासाठी चार राजकीय पक्ष एकत्र येऊन आघाडी करण्याची तयारी करण्यात आली.

आघाडीसाठी बहुजन विकास आघाडीचे नेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची काँग्रेस, मनसे आणि उबाठाच्या स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील नेत्यांनी भेट घेतली. आघाडी बाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर जागा वाटप आणि निवडणूक चिन्ह यावर बैठका पार पडल्या. आघाडीत समाविष्ट सर्व राजकीय पक्षांनी 'शिट्टी' या बहुजन विकास आघाडीच्या पारंपरिक चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीकडून ठेवण्यात आला. मात्र काँग्रेस आणि उबाठाच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. उलट आघाडीतील सर्व राजकीय पक्षांनी 'वसई-विरार महाविकास आघाडी' स्थापन करून 'शिट्टी' या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र बहुजन विकास आघाडीने 'शिट्टी' हे चिन्ह यापूर्वीच नोंदणीकृत करून ठेवलेले आहे. त्यामुळे वसई-विरार महाविकास आघाडी तयार करण्याचा प्रश्नच राहत नसल्याचे बहुजन विकास आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले. परिणामी निवडणूक चिन्ह या एकाच मुद्द्यावरून आघाडीमधील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत झाले नाही. काँग्रेसच्या नेत्यांनासुद्धा पंजा या निशाणीवरच ही निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे चिन्हाचा प्रस्ताव त्यांनी सुद्धा मान्य केला नाही.

दरम्यान, आघाडीमध्ये उबाठा गटाने एकूण २२ जागांची मागणी केली होती. प्राथमिक चर्चेनंतर पंधरा जागा घेण्यास त्यांनी तयारी दाखविली. मात्र, उबाठाला एकूण आठ जागा आणि आठ जागांमधील सात जागा या महिलांसाठी राखीव असलेल्या दिल्या जातील, असा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीने ठेवला. हा प्रस्ताव मान्य नसल्याने शिवसेना उबाठा गटाने आघाडीतून बाहेर निघत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी या दोन राजकीय पक्षांमध्येसुद्धा जागा वाटपाबाबत एकमत होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुती वगळता वसई-विरारमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढणार असे संकेत दिसून येत आहेत.

भाजप-शिवसेना महायुतीची आज पहिली यादी येणार

शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप हे महायुती म्हणून वसई-विरार महापालिकेची निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीसाठी प्राथमिक बैठका वसई-विरारमध्ये पार पडल्या आहेत. जागा वाटपाबाबत गेल्या दोन दिवसापासून मुंबईत दोन्ही राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत. शुक्रवारी भाजप-सेना युतीच्या उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Add Comment