विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले
रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला अबाधित ठेवला असून, या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २० पैकी १८ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनश्री समीर शेडगेही विजयी झाल्या, तर भाजपा आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली. उबाठा आणि काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आली नाही. विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांनी गेल्या ४० वर्षांपासून रोहा शहर हद्दीत विविध विकासकामे केल्याने रोह्यातील मतदारांनी यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत भरभरून मतदान केल्याने परत एकदा रोहा नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. त्यामुळे विरोधकांना आपले विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही. रोहा नगरपरिषदेत यावेळी परिवर्तन करण्याच्या इराद्याने विरोधकांनी खुप प्रयत्न केले; परंतू त्यांना विजय मिळविता आला नाही.
खासदार सुनिल तटकरे यांना रोह्यातील मतदारांची नाडी माहिती असल्याने त्यांनी त्या दृष्टीने रोहा शहराचा विकास केला. या विकासकामांत नदी संवर्धन, गॅलेक्सी हॉस्पिटल तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच प्रतिमा असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याची स्थापना रोहा शहरात केली. याशिवाय हनुमान टेकडी येथील नूतनीकरण, मारुती चौक येथील हनुमान मंदिराचे नूतनीकरण करून त्याचा जीर्णोद्धार केला आहे. तसेच रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीरमहाराजांच्या मंदिराचाही त्यांनी नूतनीकरण करून जीर्णोद्धार केले आहे, त्याचबरोबर डॉ. सी.डी. देशमुख नाट्यसभागृहाचे नूतनीकरण, एवढेच नव्हे, तर रोहा शहरातील महिलांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणीटंचाई तो देखील त्यांनी मार्गी लावला. बेरोजगारांच्या हाताला काम नसल्याने तटकरे यांनी धाटाव औद्योगिक क्षेत्रात देखील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. या विकासाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारेल असा विश्वास तटकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना असल्याने यावेळी महायुतीद्वारे रोह्यात निवडणूक न लढविता राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढविली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीमधील घटक पक्ष असूनही, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात शिंदेगट शिवसेना, भाजप आणि उबाठा यांची युती झाली होती. काँग्रेस स्वतंत्र लढली तरीही या सर्वांना राष्ट्रवादीने धोबीपछाड केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे २० पैकी नगराध्यक्षासह १८ उमेदवार निवडून आले. भाजपा आणि शिंदे गट शिवसेनेला प्रत्येकी एकच जागा मिळाली. काँग्रेस आणि उबाठाच्या वाट्याला भोपळा आला. यावरून रोह्यात आजही राष्ट्रवादी काँग्रेस बाजीगर असल्याचे या निवडणुकीवरून दिसून आले. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांना खुप परिश्रम घ्यावे लागणार हे निश्चित!
दरम्यान, एकुणच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शहरात उमेदवार उभे करून खासदार सुनिल तटकरेंची कोंडी करण्याची खेळी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी खेळली होती. ही खेळी या निवडणुकीत त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र दिसून आले. रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोडून तटकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत उतरविण्याची खेळी शिवसेनेने खेळली होती. याच रणनितीचा भाग म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांनी फोडून शिवसेनेने शिल्पा धोत्रे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरविले होते; परंतू त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वनश्री समीर शेडगे यांच्यासमोर टिकाव लागला नाही. त्यांनी श्रीमती धोत्रे यांना चितपट केले. याशिवाय शिवसेनेचे अन्य नगरसेवक पदाचे उमेदवारही तेवढा प्रभाव पाडू शकले नाही हेही तेवढेच खरे !






