Thursday, December 25, 2025

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता

मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, माहिम आणि वरळी विधानसभेत मोडणाऱ्या प्रभादेवीतील प्रभाग क्रमांक १९४ची जागा मनसेला सोडण्यावरून उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. मनसेने दोन्ही इच्छुकांच्या नावाला उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी ना पसंती दर्शवली आहे. मनसेला हा प्रभाग सोडण्यास उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा जोरदार विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रभाग उबाठा गटालाच सोडला जावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उबाठाने मनसेला हा प्रभाग सोडल्यास याठिकाणी उबाठा गटाला मोठ्या बंडखोरीला सामोरे जाण्याची भीती प्रभागातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वरळीतील प्रभाग क्रमांक १९४मध्ये सध्या शिवसेनेचे समाधान सरवणकर हे नगरसेवक आहेत आणि समाधान सरवणकर यांना रोखण्यासाठी उबाठा पक्षामध्ये आधीपासूनच रणनिती ठरलेली आहे. या प्रभागातून उबाठा गटाच्यावतीने शेखर भगत आणि कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून उबाठा गटाच्यावतीने प्रचाराला सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु स्थानिकांनी शेखर भगत यांच्या नावाला आधीच नापसंती दर्शवत यांच्या उमेदवारीला एकप्रकार विरोध केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यातुलनेत उबाठा गटाचे कैलास पाटील यांचा प्रचार जोरात सुरु आहे. मात्र, उबाठा गटआणि मनसेच्या युतीमध्ये प्रभाग क्रमांक १९४ ची जागा मनसेला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या प्रभागातून मनसेच्यावतीने माजी नगरसेवक संतोष धुरी आणि मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

मनसेत किल्लेदार आणि धुरी यांच्यामध्ये उमेदवारी मिळवण्यावरून चढाओढ सुरु असली तरी दुसरीकडे उबाठाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मनसेला हा प्रभाग न सोडण्याची विनंती केली आहे. तसेच मनसेकडून किल्लेदार किंवा धुरी यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही असा संदेशच आमदार आणि विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या माध्यमातून पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे माहिम आणि वरळी विधानसभेत मोडणाऱ्या या प्रभागातून उबाठा गटाचाच उमेदवार लढणार असे स्पष्ट करत एकमेव कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.मात्र, या प्रभागातून वरळीतील आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत हेही इच्छुक असल्याने कोणत्याही परिस्थितील हा प्रभाग मनसेला न सोडण्यावर उबाठाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रभाग येत्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार समाधान सरवणकर यांच्या विरोधात उबाठा गटाचे उमेदवारच चांगली लढत देवू शकतो आणि जर मनसेचा उमेदवार आल्यास सरवणकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल असेही काही उबाठाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment