पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार
पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधून सिडकोने घनकचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोमार्फत नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाबाबत तात्काळ कार्यवाही करून त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याचे आणि तो प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ४६ गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार असून यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कामी आला आहे.
ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले होते. पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रात येतात. या भागात निवासी, औद्योगिक व वाणिज्यक विकास मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लोकसंख्या आणि स्थलांतर वाढले आहे. परिणामी कचरा निर्मितीही प्रचंड प्रमाणात होत आहे. नैना अधिसूचित क्षेत्रात एकूण ४६ गावांचा समावेश असून, या सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घनकचरा निर्माण होत आहे. सध्या ग्रामपंचायती कचरा संकलन करतात. मात्र आर्थिक, तांत्रिक साधनसामग्री व मनुष्यबळाच्या अभावामुळे शास्त्रीय पद्धतीने कचरा प्रक्रिया करणे शक्य होत नाही. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे व चालवणे ग्रामपंचायतींसाठी खर्चिक आहे. म्हणून सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामीण भागात निर्माण होणारा कचरा सिडकोच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामार्फत प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया व वाहतूक खर्च ग्रामपंचायतींना परवडणारा नसल्याने सिडकोने ग्रामपंचायतींसोबत करार करून प्रक्रिया खर्च माफ केल्यास आणि कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारल्यास ग्रामीण भागात आदर्श घनकचरा व्यवस्थापन शक्य होईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोला सूचित केले होते. त्या अनुषंगाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोकडून संबंधित ग्रामपंचायतींना प्रत्येक गावाची लोकसंख्या, दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण तसेच सद्यस्थितीत त्या कचऱ्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते, याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विषयावर सविस्तर चर्चा व पुढील कार्यवाहीसाठी मंगळवार दिनांक ३० डिसेंबरला दुपारी ०२ वाजता बेलापूर सिडको भवन येथे बैठक होणार असून एकात्मिक व शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.






