Thursday, December 25, 2025

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते

वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार पासून सुरू झाली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक असलेल्या सहा दिवसांपैकी दोन दिवस शासकीय सुट्टी असल्याने, केवळ चार दिवसांचा कालावधीच उमेदवारांकडे आहे. त्यामुळे युती- आघाडी आणि जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या शासकीय निवासस्थानी पार पडली असून, काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डची मीटिंग सुद्धा गुरुवारी टिळक भवन येथे होणार आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक भाजप शिवसेना महायुती म्हणून लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी या महायुतीमध्ये समाविष्ट असेल किंवा नाही हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे. तसेच या निवडणुकीत भाजप हा मोठा भाऊ राहणार असून शिवसेनेला किती जागा सोडाव्या याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय झालेला नाही. दोन पक्षामधील जागावाटपाचा हा तिढा असतानाच, गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही पक्षांतील काही इच्छुकांना उमेदवारी न देता त्यांच्या कुटुंबातील महिलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. मात्र यासाठी ‘दादा’ ‘भाऊ’ तयार नसल्याने हा नवा पेच नेत्यांसमोर निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्षातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देत, भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोपदेखील अनेक ठिकाणी केला जात आहे. या सर्व मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे बुधवारी विशेष बैठक पार पडली आहे. दरम्यान, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची नावे सर्वप्रथम मंडळ अध्यक्षांकडे घेण्यात आली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे निवडणूक प्रभारी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, प्रदेश पदाधिकारी अतुल काळसेकर, खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती घेण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची नावे, तसेच शिवसेनेकडून मागणी करण्यात आलेल्या जागांचे प्रभाग आणि उमेदवार संख्या या सर्व विषयावर बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. येत्या दोन दिवसांत भाजप-शिवसेना युती, जागावाटप आणि इतर सर्व विषयांवर माहिती दिली जाणार आहे.

'हात' शिट्टी फुंकणार का ?

वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीसोबत निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजकीय पक्षांनी शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवावी. याबाबत सबब कारणे देत बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपला प्रस्ताव काँग्रेस आणि मनसे समोर ठेवला आहे. मनसे हा प्रस्ताव मान्य करून दोन जागांसाठी खास आग्रही आहे. मात्र ठाकूर यांच्या भेटीला आलेल्या काँग्रेस, उबाठा नेत्यांनी हा विषय वरिष्ठ पातळीवर नेऊन ठेवला आहे. कमी जागा मिळाल्या तरी चालतील मात्र भाजपच्या टीकेचे धनी न होण्यासाठी उबाठा नेत्यांना शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढण्याचे सद्या तरी मान्य नाही. तर काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग गुरुवारी टिळक भवनात होत आहे. या सभेत वसई-विरार महापालिका संबंधित विषयावर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार, माजी खासदार यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे. एकंदरीतच बहुजन विकास आघाडी काँग्रेस आणि उबाठा यांच्या आघाडीबाबत सुद्धा येत्या दोन दिवसांतच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment