Thursday, December 25, 2025

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!
नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'शिवमनी वर्ल्ड एंटरटेनमेंट' निर्मित आणि मानसी टाकणे यांची पहिली निर्मिती असलेला हा कार्यक्रम रंगभूमीवर नृत्य, प्रकाश आणि ध्वनी यांच्या समन्वयाने एक वेगळा प्रयोग सादर करणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने सादर होणार आहे आणि यात केवळ तीन कलाकार नृत्य सादर करणार आहेत. शिवानी कथले यांनी सांगितले, "रिदम ऑन फायर डान्स शो ची संकल्पना वेगळी आहे. या कार्यक्रमाची 'वर्ल्ड टूर' करण्याचं आमच्या संपूर्ण टीमचं स्वप्न आहे." ‘रिदम ऑन फायर’ मध्ये लाईट्स आणि साऊंड या घटकांचे महत्व खूप मोठे आहे आणि या दोन तांत्रिक बाजूंच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्या स्तरावर नेला जाणार आहे. कार्यक्रमात निकिता मानकामे, ऐश्वर्या शिंदे आणि शिवानी कथले या तीन गुणी नृत्यांगना नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना साई पीयूष यांची आहे, ज्यांनी या डान्सिकलसाठी थीम साँगदेखील तयार केले आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी विश्वास नाटेकर आणि मयूर वैद्य यांनी सांभाळली असून, त्यांनी या सादरीकरणात खास 'वेगळेपण' जपले आहे. या डान्सिकल शोच्या दिग्दर्शनाची बाजू प्रशांत विचारे यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. कार्यक्रमाचे नियोजन आणि निवेदन मनोज टाकणे करत आहेत. त्यांच्या निवेदनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रेक्षकांशी थेट संवाद साधून कार्यक्रमाला अधिक रंगतदार बनवतील. शीतल तळपदे यांची प्रकाश योजना 'नेत्रदीपक' असून, मयूरा रानडे यांनी खास आणि वेगळी वेशभूषा तयार केली आहे. रविवार, २८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रिदम ऑन फायरचा प्रयोग आहे.
Comments
Add Comment