Wednesday, December 24, 2025

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त व्यापार करारावर (FTA) यशस्वीरित्या वाटाघाटी पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा सोमवारी केली. या करारामुळे भारतीय व्यावसायिक, विशेषतः योग प्रशिक्षक आणि शेफ यांच्यासाठी न्यूझीलंडची दारे उघडली जाणार असून, भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासानंतर तिथे काम करण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन करारानुसार, न्यूझीलंडने आपल्या व्हिसा नियमांमध्ये मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. यामुळे दरवर्षी सुमारे ५,००० भारतीय व्यावसायिकांना न्यूझीलंडमध्ये काम करण्याची संधी मिळेल. यामध्ये प्रामुख्याने भारतीय योग प्रशिक्षक आणि हॉटेल शेफ यांचा समावेश असेल. जागतिक स्तरावर भारतीय कौशल्यांना मागणी वाढत असताना, न्यूझीलंडने घेतलेला हा निर्णय भारतीय सेवा क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना मिळणार 'पोस्ट-स्टडी' वर्क व्हिसा

न्यूझीलंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा करार मोठा दिलासा देणारा ठरला आहे. नव्या तरतुदींनुसार, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथेच थांबून नोकरी करण्यासाठी आता दीर्घकालीन वर्क व्हिसा मिळू शकेल. या निर्णयामुळे न्यूझीलंड हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्याच आठवड्यात या कराराला हिरवा कंदील दाखवला आहे. आता हा करार न्यूझीलंडच्या संसदेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अधिकृत स्वाक्षरीनंतर साधारणपणे सात ते आठ महिन्यांत या कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या करारामुळे केवळ व्हिसाच नाही, तर दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांच्या व्यापारातही मोठी वाढ होणार आहे.

न्यूझीलंड देणार ४ वर्षांपर्यंतचा 'पोस्ट-स्टडी' वर्क व्हिसा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे भारतीय तरुणांसाठी संधींची कवाडं उघडली आहेत. न्यूझीलंडने आपल्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचा 'विद्यार्थी गतिशीलता आणि अभ्यासोत्तर वर्क व्हिसा' करार केला असून, त्याचा मान भारताला मिळाला आहे. विशेष म्हणजे, या करारांतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना न्यूझीलंडमध्ये शिक्षणासोबतच कामाचेही अधिकार अधिक व्यापक करण्यात आले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या करारातील व्हिसा सवलतींची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार खालीलप्रमाणे वर्किंग व्हिसा मिळेल.

पदवी अभ्यासक्रम (Bachelor Degree): पूर्ण केल्यास २ वर्षांचा वर्किंग व्हिसा.

ऑनर्ससह बॅचलर किंवा STEM पदवी (विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित) : पूर्ण केल्यास ३ वर्षांचा वर्किंग व्हिसा.

पदव्युत्तर शिक्षण (Master’s Degree) : न्यूझीलंडमध्ये पूर्ण केल्यास थेट ४ वर्षांचा वर्किंग व्हिसा मिळणार आहे.

याशिवाय, तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला २० तास काम करण्याचा कायदेशीर अधिकार असेल, ज्यावर कोणतीही संख्यात्मक मर्यादा नसेल.

५,००० भारतीय व्यावसायिकांसाठी विशेष कोटा

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर कुशल भारतीय व्यावसायिकांनाही न्यूझीलंडमध्ये मानाचे स्थान मिळणार आहे. योग प्रशिक्षक, शेफ, आयटी व्यावसायिक, शिक्षक आणि परिचारिका अशा सुमारे ५,००० भारतीय तज्ज्ञांना न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी 'प्रोफेशनल व्हिसा' दिला जाईल. हा व्हिसा जास्तीत जास्त ३ वर्षांच्या वास्तव्यासाठी असेल आणि हा कोटा सध्याच्या अस्तित्वात असलेल्या व्हिसा मार्गांच्या व्यतिरिक्त (In addition to existing visas) असणार आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी साधारण १२,००० भारतीय विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. या नव्या करारामुळे या विद्यार्थ्यांच्या पदवीनंतरच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. हा करार 'तात्पुरत्या रोजगार प्रवेश व्हिसा'च्या माध्यमातून भारतीय व्यावसायिकांना कुशल रोजगाराचे सुरक्षित मार्ग प्रदान करतो, ज्यामुळे भारतीय बुद्धिमत्तेला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.

भारतीय तरुणांना न्यूझीलंडची 'हॉलिडे' भेट!

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या ऐतिहासिक करारामुळे केवळ विद्यार्थीच नाही, तर तरुण पर्यटकांनाही रोजगाराची संधी मिळणार आहे. या करारांतर्गत न्यूझीलंडने दरवर्षी १,००० भारतीय तरुणांसाठी 'वर्किंग हॉलिडे व्हिसा' देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे, हा नवा व्यापार करार सध्या अस्तित्वात असलेल्या व्हिसा प्रक्रियांना धक्का न लावता, भारतीय नागरिकांसाठी रोजगाराचे अतिरिक्त आणि प्राधान्य देणारे मार्ग खुले करणार आहे.

'वर्किंग हॉलिडे व्हिसा' आणि १००० तरुणांना संधी

नव्या करारातील सर्वात आकर्षक तरतूद म्हणजे 'वर्किंग हॉलिडे व्हिसा'. या योजनेअंतर्गत १८ ते ३० वयोगटातील १,००० तरुण भारतीयांना दरवर्षी न्यूझीलंडला जाता येईल. हा व्हिसा १२ महिन्यांच्या कालावधीसाठी असेल आणि तो 'मल्टी-एंट्री' (बहु-प्रवेश) स्वरूपाचा असेल. यामुळे तरुणांना न्यूझीलंडमध्ये फिरण्यासोबतच तिथे तात्पुरत्या स्वरूपात काम करून अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हा नवीन करार सध्याच्या 'मान्यताप्राप्त नियोक्ता कार्य व्हिसा' (Accredited Employer Work Visa) किंवा 'कुशल स्थलांतरित श्रेणी निवास व्हिसा' (Skilled Migrant Category) सारख्या प्रक्रियांना कमकुवत करणार नाही. उलट, या करारामुळे भारतीय नागरिकांसाठी एक नवीन 'प्राधान्य चॅनेल' (Priority Channel) तयार होईल. यामुळे कुशल कामगार आणि व्यावसायिकांना सध्याच्या मार्गांसोबतच एफटीए-लिंक्ड (FTA-linked) चॅनेलचा वापर करून अधिक सुलभतेने न्यूझीलंडमध्ये प्रवेश मिळवता येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा