मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. जगण्याची ही पद्धत आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असते. गोडव्याला जसं साखरेपासून दूर करता येत नाही त्याप्रमाणे जगण्याच्या पद्धतीला आपल्यापासून आपण दूर करू शकत नाही. आजच्या लेखाचं शीर्षक वाचून आपल्याला प्रश्न पडेल की योग ही जगण्याची पद्धत कशी होईल? आम्ही काही योग्यांप्रमाणे घरदार सोडून वनात तपश्चर्या करायला जाऊ शकणार नाही. संसाराच्या जबाबदाऱ्या आम्ही कशा बरं सोडू शकू? अगदी बरोबर आहे हा प्रश्न.
योग ही जीवनशैली म्हणून स्वीकारणं किंवा ती जीवनशैली होणं याचा अर्थ घरादाराचा त्याग करणं किंवा जबाबदाऱ्या सोडून देणं नाही. योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक करण्यासाठी हे काहीही त्यागण्याची गरज नाही. तर योगात सांगितल्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्त्व संतुलित करणं व ते संतुलन कायम राखता येणं म्हणजे योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारणं होय. तुम्हाला वाटेल नेमकं काय म्हणायचं आहे लेखिकेला? हेच विधान अधिक स्पष्ट करून सांगते.
सुरुवातीपासूनच्या लेखात आपण पाहिलं की योग हे निव्वळ शरीराचं शास्त्र नाही तर मनाचंही शास्त्र आहे. खरं सांगायचं तर योग हे खऱ्या अर्थानं मनाचंच शास्त्र आहे. मनाला स्थिर करणं, संतुलित करणं हा योगाचा मूळ उद्देश; परंतु नाठाळ मन एकदम स्थिर होणार नाही म्हणून प्रथम शरीर स्थिर करण्याची कला योगासनांच्या रूपानं सांगितली आहे. शरीर स्थिर झालं की मनाला नियंत्रित ठेवणं, स्थिर करणं सोपं जातं. मन स्थिर व्हायला लागलं की बुद्धीही स्थिर होते. मन हे भावनांचं घर आहे तर बुद्धी विचारांचं. बुद्धी विचार करते तशा भावना मनात निर्माण होतात. बुद्धीतील विचार आणि मनातील भावना यांच्यानुसार मनुष्य बोलतो आणि कृतीही करतो. थोडक्यात आपल्या कृतीचं आणि उक्तीचं मूळ आपल्या मन आणि बुद्धीत आहे.
बुद्धीतील विचार जेव्हा योग्य आणि संतुलित असतात तेव्हा आपलं बोलणं आणि कृती यामध्येही हे संतुलन दिसून येतं. याविरुद्ध जेव्हा बुद्धीत विचारांचा गोंधळ असतो किंवा आपल्या भावना नेमक्या कशा आहेत हे आपल्यालाच माहीत नसतं तेव्हा भावना नकारात्मक होतात व उक्ती आणि कृती यांमध्ये गोंधळ व अविवेक दिसून येतो. मन-बुद्धीचं हे संतुलन निर्माण करण्याचं प्रभावी साधन योग आहे. नियमित आणि निरंतर योगसाधनेनं मन आणि बुद्धी हळूहळू स्थिर व्हायला लागतात. स्थिरबुद्धी कोणताही विषय अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते. विषय योग्यप्रकारे समजला की मनुष्य योग्य निर्णय घेतो. योग्य निर्णयात टोकाची भूमिका घेतली जात नाही तर सुवर्णमध्य साधला जातो ज्यामुळे अधिकाधिक लोकांचा फायदा होतो. असा विवेकी निर्णय नेहमीच समाधान आणि आनंद देतो.
अशाप्रकारे योगसाधना नियमित करत राहिलं तर मन बुद्धीची ही संतुलित आणि स्थिर अवस्थाही नित्य होते आणि योगसाधकाच्या स्वभावाचा जणू तो अविभाज्य घटक होतो. अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, एखादा निर्णय घेताना किंवा कृती करताना अशा व्यक्तीला जाणीवपूर्वक मन किंवा बुद्धी स्थिर ठेवायला लागत नाही किंवा तिचं संतुलन आहे की नाही हे तपासायला लागत नाही. सहजपणे त्याचे विचार, उच्चार आणि वर्तन संतुलित होतात. अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजेच योग हा जीवनशैलीचा भाग होणं होय.
तानपुऱ्याच्या सर्व तारा योग्य सुरांत जुळल्या की जसा समरस झालेला, शांतता देणारा झंकार त्यांतून निर्माण होतो त्याप्रमाणे योगसाधनेने बुद्धी, मन, वाणी, कृती यांच्यात निर्माण झालेली एकतानता मनात आनंदाचा अखंड, सुरेल झंकार निर्माण करते.
योग म्हणजे जोडणी. योग शब्दाच्या या अर्थानुसारच योग खरोखरच आपल्या मन, बुद्धी, वाणी आणि वर्तनात जोडणी करतो. आपल्याच व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख करून देतो. आपल्या गुणदोषांची जाणीव करून देतो ज्यामुळे जागरूकतेनं आपण आपल्यात चांगले बदल घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वात संतुलन निर्माण करून योग आपल्याला समग्र निसर्गाशी जोडतो. केवळ आपला आपल्याशीच संयोग घडवून आणतो असं नाही तर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांशी, समाजातील इतर व्यक्तींशी, घटकांशी आपला संयोग व सुसंवाद घडवून आणतो. प्रत्येकामध्ये ईश्वरी शक्ती पाहायला शिकवतो. अशारीतीने संतुलन आणि संयोग हा योगसाधकाचा स्वभाव होतो.
वाऱ्यावर डोलणाऱ्या लहानशा गवतफुलात जो आनंद दिसतो तसाच लहान लहान कृतीमध्येही आनंद घेण्याची कला योगामुळे आपल्यात आपोआप झिरपत जाते. म्हणजेच ती आपली जीवनशैली होते. तुम्ही फार आदर्श स्थितिविषयी बोलताय. खरंच असं होऊ शकतं का?
असा प्रश्न मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे कारण इतक्या संतुलित आणि योगीमनाच्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला फारशा दिसत नाहीत. मनाची अशी स्थिरता आणि संतुलन प्राप्त करणं हीदेखील अशक्यप्राय गोष्ट वाटते.
परंतु लहान लहान गोष्टींनी विचलित होणाऱ्या मनाला काही अंशी तरी शांत आणि स्थिर करण्याचं तंत्र योगसाधनेनं प्राप्त होतं हे स्वतः लेखिकेनं अनुभवलं आहे. योगपदविका अभ्यासक्रम करताना अनेक अडचणी येऊनसुद्धा मन शांत ठेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सामर्थ्य लेखिकेला योगानंच दिलं. इतकंच नाही तर त्यामुळे लेखिकेच्या मुलालाही हा अभ्यासक्रम शिकण्याची प्रेरणा मिळाली. आत्मविश्वासाचा, निर्णयक्षमतेचा अभाव या त्रुटींवर त्यालाही मात करता आली. त्याच्या देहबोलीतून व्यक्त होणारा आत्मविश्वासाचा अभाव आपोआप नाहीसा होऊन देहबोली अतिशय सकारात्मक झाली. तणाव न घेता, एकाच वेळी स्थिरचित्ताने अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा देण्याची त्याच्या मनाची तयारी झाली. विचारक्षमता वाढल्यामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं सामर्थ्यही वाढलं.
योगसाधनेच्या आलेल्या या सकारात्मक अनुभवांमुळेच मुळातून योगसूत्र त्यावरील ग्रंथ वाचण्याची आणि अधिक खोल विचार करण्याची प्रेरणा लेखिकेला मिळाली. योग अजूनही माझी जीवनशैली झाली नसेल तरी हे आपलं ध्येय आहे हे मात्र लेखिकेला निश्चितच लक्षात आलं आहे.






