ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक
पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत मजुरांसाठी वापरण्यात येत असलेले मस्टर रोल अद्ययावत, पारदर्शक आणि अचूक असल्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. तसेच उदाहरण म्हणून संपूर्ण राज्यात असा मस्टर रोल दाखवता येईल, असेदेखील म्हणाले. त्यामुळे पालघरचे मस्टर रोल राज्यभर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी रविवारी पालघर तालुक्यातील कोकणेर, चहाडे, धनसार आणि वडराई ग्रामपंचायतींना भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्रकल्प संचालिका रुपाली सातपुते, मनरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, पालघर गटविकास अधिकारी संजय भोये, उमेद अभियानाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच संबंधित सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी महिला स्वयंसहायता गटांचे उपक्रम, मनरेगा कामे, घरकुल योजना आणि ग्रामपंचायत प्रशासनाची कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेतला. नावीन्यपूर्ण व महिला-केंद्रित उपक्रमांचे विशेष कौतुक करत ग्रामपंचायतींना अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश दिले. महिलांच्या स्वयंसहायता गटामार्फत चालू असलेल्या नाचणी बिस्किट उत्पादन प्रकल्पाची पाहणी केली.
महिलांच्या उद्योगांनाही दिली भेट
प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी यावेळी धनसार आणि वडराई ग्रामपंचायतींना भेट देत महिला-केंद्रित उपक्रमांची पाहणी केली. वडराई येथे उत्पादक गटामार्फत महिलांनी एकत्र येऊन उभारलेल्या मत्स्य व्यवसायाची पाहणी केली. महिलांच्या धनसार येथे यशस्वी प्रभाग संघाच्या महिला उत्पादक गटामार्फत चालू असलेल्या पोल्ट्री व्यवसाय, शिलाई उद्योग, रिक्षा चालक व्यवसाय आणि इतर लघुउद्योगांचा आढावा घेतला. महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध लघु उद्योगांबाबत त्यांनी समाधान मानले.






