Tuesday, December 23, 2025

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार

मुंबई : “मुख्यमंत्रीपदी असताना आम्ही शासन आपल्या दारी उपक्रम राबवला होता. साडेपाच कोटी नागरिकांना याचा फायदा झाला होता. आता बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त आरोग्य विभागाकडून ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार आहोत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले, नगर परिषदांच्या निकालांमधून शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत विस्तारली आहे, हे स्पष्ट झाले. लोकसभेत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. विधानसभा निवडणुकीतही स्ट्राईक रेट इतर पक्षांच्या तुलनेत चांगला होता. आता कमी जागा लढून जास्त जागा जिंकलो हा देखील चांगला स्ट्राईक रेट आहे. आमदार नसलेल्या ठिकाणीही शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. राज्यात शिवसेनेचे ६२ नगराध्यक्ष निवडून आले असून, यात ३३ लाडक्या बहिणींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

नगर परिषद निवडणुकीत उबाठा आणि महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते. जे घरी बसले त्यांना कायमचे घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बेरजेपेक्षा शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेची जोडलेली आहे, ती कधीही तुटू शकत नाही. शिवसेनेला हरवणे अशक्य आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment