Tuesday, December 23, 2025

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

दोनच चित्रपटांत १२०० कोटी; आदित्य धरचा थक्क करणारा प्रवास

मुंबई : ‘धुरंधर’ या चित्रपटाने आदित्य धर यांना बॉलीवूडमधील खरा धुरंधर ठरवले आहे. सध्या चर्चेत असलेल्या दिग्दर्शकांमध्ये आदित्य धर आघाडीवर असून, जवळपास वीस वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी हे यश मिळवले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी २०१९ मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि तब्बल सहा वर्षांनंतर २०२५ मध्ये दुसरा चित्रपट साकारला. या दोनच चित्रपटांनी मिळून जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून, मात्र या यशापर्यंतचा आदित्य धर यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

आदित्य धर यांनी अनेक मुलाखतींमध्ये फसवणुकींचा खुलासा केला आहे. अनेकदा त्यांच्या कथा आणि पटकथा चोरल्या गेल्या आणि त्याच कथांवरून १०० कोटींचे चित्रपट तयार करण्यात आले अपयश येऊनही आपण कधी हार मानली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पणासाठी त्यांना तब्बल सहा वर्षे वाट पाहावी लागली आणि अखेर त्यांचे स्वप्न साकार झाले. पदार्पणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, २०१३ आणि २०१६ मध्ये प्रयत्न करूनही अखेर २०१९ मध्येच त्यांना दिग्दर्शनाची संधी मिळाली. मात्र रॉबिन भट्ट आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्यांना सतत प्रोत्साहन दिले, तर त्यांच्या मोठ्या भावानेही कायम पाठीशी उभे राहून साथ दिली.

‘उरी’ने बदलले नशीब

आदित्य धर यांनी सांगितले की, पाठिंबा मिळत असतानाही त्यांच्या अनेक चित्रपट प्रकल्प शेवटच्या क्षणी बंद पडत होते. मात्र २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटाने जगभरात ३५८ कोटी रुपयांची कमाई केली आणि अभिनेता विकी कौशलच्या कारकिर्दीलाही नवे वळण दिले.

फवाद खानसोबतचा अपूर्ण प्रकल्प

आदित्य धर यांनी २०१६ मध्ये ‘रात बाकी’ नावाचा चित्रपट बनवण्याची तयारी केली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि फवाद खान प्रमुख भूमिकेत होते आणि हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सकडून तयार होत होता. मात्र त्याच वर्षी उरी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आणि वादानंतर करण जोहर यांनी पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच थांबला.

यानंतर आदित्य धर यांनी माघार न घेता आपल्या भावासोबत मिळून B62 स्टुडिओजची स्थापना केली. या बॅनरखाली ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘बारामुल्ला’ हे चित्रपट तयार झाले. सुमारे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ने १०५ कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘बारामुल्ला’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

B६२ स्टुडिओजची ताजी निर्मिती ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर’ने आतापर्यंत जगभरात ८०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून, लवकरच ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’चा लाइफटाइम कलेक्शन मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >