Monday, December 22, 2025

कोकणातही पसरली बिबट्यांची दहशत

कोकणातही पसरली बिबट्यांची दहशत

वार्तापत्र : कोकण

वन्यप्राणी रस्त्यावर आलेत. याची अनेक कारणं असली तरी, जंगलाला रानमोडी वनस्पतीने घातलेला वेढा हे देखील एक प्रमुख कारण आहे. रानमोडीने जंगलातील अनेक झाडं-झुडपं नष्ट केली आहे. रानमोडी पसरल्यावर कोणत्याही भागातील अन्य झाडांवर अतिक्रमण होतं आणि एकदा रानमोडी पसरली की, आपोआपच परिसरातील इतर झाडं नष्ट होतात ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील जंगलांमध्ये आता रानमोडीच वाढलेली दिसते. बाकीची सगळीच झाडं आणि झुडपांच्या जागी रानमोडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. रानमोडीच्या अतिक्रमणामुळेही जंगलातील वन्यप्राणी जंगल सोडून गावो-गावच्या मानवी वस्तीकडे आले आहेत. बिबटे तर एवढे वाढले आहेत, की आज कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बांद्यापर्यंत बिबटे दिसतात. कधी कोणाच्या अंगणात, तर कधी घराशेजारी, कधी गुरांच्या गोठ्यात, तर कधी अगदी भरदिवसा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसून येतो...

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वन्यप्राण्यांनी जंगल सोडून मानवी वस्तीत प्रवेश केला. कोकणात तर हत्ती, बिबटे, गवारेडे आदी वन्यप्राण्यांनी कोकणातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचे जगणेच हैराण करून सोडले आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्ह्यांमध्ये दिवसा-ढवळ्या वन्यप्राणी महामार्गांवर फिरताना आढळून येत आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी बिबट्याचे दर्शन दुर्मीळ होते. फार क्वचित कुठल्यातरी जंगलाच्या शेजारच्या एखाद्या गावात वाघाची डरकाळी कानी पडायची. तेव्हा कुठे गावात चर्चा व्हायची, 'जंगलात वाघ इलो असो वाटता'. आज-काल वाटण्याचा विषयच नाही. बिबट्यांचा तर गावो-गावी मुक्त संचारच असतो. ग्रामीण भागातील अनेकवेळा रात्री आणि दिवसाच्या प्रवासातही बिबट्या रस्ता अडवून बसलेला असतो. पाणवठ्याच्या जागांवर, नदी, ओढ्यांच्या किनाऱ्यावर बिबट्या हमखास पाणी प्यायला येतो. काही गावकुसाबाहेर वन्यप्राणी पाणी प्यायला येण्याच्या काही खास जागाही आहे. या पाणीसाठा असणाऱ्या ओढ्यांवर हमखास वन्यप्राणी असतातच. पूर्वीच घनदाट असणार कोकणातील जंगल आज विरळ होत गेलंय. जंगलातील जुनाट मोठे वृक्ष, जंगली फळ देणारी झाडं आज फारशी कुठे दिसत नाहीत. तेथे जंगल वाढलेय ते रानमोडीने. साहजिकच यामुळे कोकणातील पूर्वीची जंगले कुठे दृष्टीस पडत नाही. पक्षी आणि माकडं सारेच त्यांच्या-त्यांच्या भागांतून स्थलांतरीत झाले आहेत.

माकडांनी तर वस्तीतच ठाण मांडले आहे. गावो-गावच्या वस्तीत तर झाडांवर माकडे दिसतात. एवढच कशाला गावातील घराशेजारील झाडांवर असणारी माकड झाडांवरून थेट घरात कधी प्रवेश करतात हेच मुळी कोणाला कळत नाही. घरातील माणसं शेतात कामाला जातात. घरामध्ये कोणाचीही चाहूल लागत नाही, घरात कोणीच नाही. हे पाहून माकडं घरात शिरतात. शेतात कामासाठी जाणारी शेतकरी लोक शेतात कामाला जाताना जेवण तयार करून ठेवतात आणि शेतात जातात. कोणत्या तरी मार्गाने माकड घरात प्रवेश करतात आणि तयार करून ठेवलेल्या जेवणाचा फडशा पाडतात. अनेक कुटुंबीयांनी माकडांचा हा अनुभव घेतला आहे. हा प्रकार ग्रामीण भागातच घडतोय असे नव्हे तर शहरी भागातही असेच अनेकांना अनुभव आलेले आहेत. एवढच कशाला अनेक बंगल्यात थेट प्रवेश करून माकड डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फळांची नासधूस करतात याची चर्चा अनेकवेळा कानावर येते. त्यामुळे कोकणातील सर्वसामान्य, शेतकरी या वन्यप्राण्यांच्या मुक्त संचाराने पूर्ण हैराण आहेत. वन्यप्राणी रस्त्यावर,गावात शिरायला अनेक कारण आहेत. त्यात जंगलाला रानमोडी वनस्पतीने घातलेला वेढा हे देखील प्रमुख कारण आहे. रानमोडीने जंगलातील अनेक झाडं-झुडपं नष्ट केली आहेत.

रानमोडी पसरल्यावर कोणत्याही भागातील अन्य झाडांवर अतिक्रमण होत आणि एकदा रानमोडी पसरली, की आपोआपच परिसरातील इतर झाडच नष्ट होतात. ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील जंगलांमध्ये आता रानमोडीच वाढलेली दिसते. बाकीची सगळीच झाडं आणि झुडपांच्या जागी रानमोडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. रानमोडीच्या अतिक्रमणामुळेही जंगलातील वन्यप्राणी जंगल सोडून गावो-गावच्या मानवी वस्तीकडे वळत आहेत.

बिबटे तर एवढे वाढले आहेत, की आज कोकणातील पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यापर्यंत बिबटे दिसतात. कधी कोणाच्या अंगणात तर कधी घराशेजारी, कधी गुरांच्या गोठ्यात तर कधी अगदी भरदिवसा बिबट्या रस्त्यावर फिरताना दिसून यायला लागले. बऱ्याचवेळा बिबट्या गावातील विहिरीत पडल्याचे देखील आपण ऐकले, पाहिले आहे. बिबट्या विहिरीत पडण्याविषयी कोकणातील विविध विषयांचे अभ्यासक सेवानिवृत्त प्रा. जी. ए. सावंत यांनी तर यावर एक विश्लेषण केलंय, त्यांनी सांगितल, की कोकणात विहिरीत बिबट्या पडतो यामागच कारण असं आहे, कोकणातील लोकांप्रमाणेच कोकणातील कुत्रेही भयंकर हुशार असतात. गावात जेव्हा बिबट्या येतो तेव्हा बिबट्याची पहिली शिकार ही गावात फिरणारी कुत्री असतात. यामुळे गावातील हे भटके कुत्रे बिबट्याच्या नजरेस पडले की बिबटे या कुत्र्यांचा पाठलाग करतात. कुत्रे बरोबर पाठलाग करणाऱ्या बिबट्यांना विहिरीशेजारी घेऊन येतात. बिबट्यांना अंदाज येत नाही. परंतु त्या कुत्र्यांना मात्र विहीरीचा अंदाज असतो. अशातच कुत्रे सहीसलामत बिबट्यांच्या तावडीतून सुटतात; परंतु बिबटे मात्र विहिरीत पडतात. यातल्या गंमतीचा भाग सोडला तरीही अनेकवेळा कोकणातील विविध भागांत बिबटे विहीरीत पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्याच नेमकेपणाने कारण कोणतेही असले तरीही बिबट्याच विहिरीत पडण्याचं प्रमाणही काही कमी नाही.

आज शासनस्तरावर हत्ती, बिबटे, माकड यांचा बंदोबस्त करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि उपाय कितीही होत असले तरीही शेतकऱ्यांना या वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास काही कमी होत नाही. पूर्वी गावातील वाडी-वस्तीत गावकरी सहजपणे फिरत असत. आज तशी स्थिती राहिलेली नाही. गावातून फिरतानाही काळजी घेत जीव मुठीत धरूनच गावात शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे. - संतोष वायंगणकर

Comments
Add Comment