Monday, December 22, 2025

लढा मराठीचा व मराठी शाळा टिकवण्याचा

लढा मराठीचा व मराठी शाळा टिकवण्याचा

मुंबई : कॉम

मराठी शाळांबाबत सकारात्मक विचार करणाऱ्यांनी आपल्या मुलांना, नातवंडांना मराठी शाळांमध्ये शिकवण्याचा आग्रह धरा. जर का आंदोलने उभी राहिली तर मराठी शाळांची जी सध्या पाडकामे सुरू आहेत ती थांबवली जाऊ शकतात. तसेच त्या ठिकाणी शाळेऐवजी इतर काही उद्योग सुरू करण्याचा मानस असेल, तर तो रोखला जाऊ शकतो. कारण या नव्याने उभारलेल्या इमारतीत मराठी शाळाच सुरू राहतील याबाबत कोणती खात्री सध्या देता येत नाही. त्यासाठी त्या शाळेत मुले शिकणे आवश्यक आहे. मराठी शाळांच्या इमारतींच्या जागी पुनर्बांधणीनंतर फक्त शाळा एके शाळाच भरावी यासाठी सर्वांनी आज पालिका प्रशासनावर जोर दिला पाहिजे किंवा तसा एक जनरेटाच उभा राहिला पाहिजे.

मुंबईत व राज्यभरात बंद पडत चाललेल्या मराठी शाळांबाबत नुकत्याच मुंबई महापालिकेवर काढलेल्या एका मोर्चामुळे सर्वांचेच लक्ष वेधले. आज परिस्थिती अशी आहे, की आज कोणालाही मराठी शाळेत घालणे संयुक्तिक वाटत नाही. आज सर्वांना आपली मुले इंग्रजी शाळेत शिकून देश परदेशात जावी असेच वाटते. त्यासाठी इंग्रजी भाषा येणे खूप महत्त्वाचे वाटते. त्यामुळे पालकांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा ते आपल्या मुलांवर लादतात व बालवयातच मुलांना इंग्रजी भाषेचे डोक्यावर ओझे घेऊन आपल्या शालेय जीवनाची सुरुवात करावी लागते. यात बरेच मुद्दे आहेत मात्र जर एखाद्या पालकाला मराठी शाळेत घालायचं असेल तर, त्यांच्याकडे काही पर्याय आहेत का? कारण आज राज्यभरात अथवा मुंबईत मराठी शाळा एकामागोमाग एक बंद पडत चाललेल्या आहेत. त्यात प्रत्येक भागातील मराठी शाळा या ठरवून बंद तर पाडल्या जात नाहीत ना, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुंबईतही सर्वच चांगल्या मराठी शाळा होत्या व आहेत मात्र त्याचे हळूहळू रूपांतर आता इंग्रजी शाळेत होत चालले आहे. त्यामुळे इतर नाही तरी निदान मुंबई महानगरपालिकेच्या शाळा तरी टिकाव्यात अशी भाबडी आशा सर्वांनाच आहे. मात्र आता मुंबई महापालिका आपल्या काही शाळांचे हळूहळू रूपांतर इंग्रजी शाळेत करत आहेत. आज याच मराठी शाळा बंद विरोधात सर्व मराठीजणांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आहे. यासाठी थेट मुंबई महानगरपालिकेवरच मोर्चा काढण्याचा निर्णय मराठी शाळाबाबतच्या परिषदेदरम्यान मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी घेतला. मात्र या मोर्चातून त्यांच्या हाती सध्या तरी काही लागले नाही. कारण सध्या सुरू असलेली आचारसंहिता त्यांच्या आड आली. त्यामुळे पालिका आयुक्तांकडूनही त्यांना ठोस असे आश्वासन मिळाले नाही, मात्र तरीही ही मराठी शाळा वाचवण्यासाठी धडपड आपल्याला कृतिशील कार्यक्रमासोबतच आंदोलनातूनही येणाऱ्या काळात करावीच लागणार आहे. कारण हा विषयच आता मोठा चिंतनशील होत चालला आहे. मराठी शाळा व मराठी भाषा वाचवण्यासाठी आंदोलने होतच राहतील पण त्याचबरोबर कृतिशील कार्यक्रम होणे ही गरजेचे आहे. त्यासाठी मराठी शाळांबाबत सकारात्मक विचार करणाऱ्यांनी आपल्या मुलांना, नातवंडांना मराठी शाळांमध्ये शिकवण्याचा आग्रह धरला पाहिजे. जर का आंदोलने उभी राहिली, तर मराठी शाळांचे जी सध्या पाडकामे सुरू आहेत ती थांबवली जाऊ शकतात. तसेच त्या ठिकाणी शाळेऐवजी इतर काही उद्योग सुरू करण्याचा मानस असेल तर तो रोखला जाऊ शकतो. कारण या नव्याने उभारलेल्या इमारतीत मराठी शाळाच सुरू राहतील याबाबत कोणती खात्री सध्या देता येत नाही त्यासाठी त्या शाळेत मुले शिकणे आवश्यक आहे. मराठी शाळांच्या इमारतींच्या जागी पुनर्बांधणी नंतर फक्त शाळा एके शाळाच भरावी यासाठी सर्वांनी आज पालिका प्रशासनावर जोर दिला पाहिजे किंवा तसा एक जनरेटाच उभा राहिला पाहिजे.

मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण संख्या साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी १ हजार १४६ होती. मात्र आज ती संख्या १ हजार ११८ झाली आहे. म्हणजेच मागील पाच वर्षांत २८ शाळा कमी झाल्या. त्यात सर्वाधिक १७ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, तर हिंदी, उर्दू शाळांमध्ये प्रत्येकी सहा शाळा कमी झाल्या. सद्यस्थितीत हिंदी माध्यमाच्या २१६, उर्दू माध्यमाच्या १८६ शाळेत विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्याच दरम्यान विद्यार्थी कमी होत असतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मात्र सहा ते सात शाळांची वाढ झाली आहे. २०१४-१५ साली मुंबई महानगरपालिका मराठी माध्यमांच्या ३६८ शाळा चालवत होती. तर आता ही संख्या २५४ इतकी झाली आहे.

विविध कारणांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरू असून गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक १७ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. काही शाळेच्या इमारती अतिधोकादायक असल्याचे पालिकेने घोषित केले आहे. त्यात शाळेचे तोडकाम करण्यात येत आहे. त्यामुळे तोडलेले शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याऐवजी ती शाळा तोडण्याचा घाट पालिकेने सुरू केल्याचा आरोपही आता संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मराठी शाळा आणि अंगणवाड्या टिकल्या नाही, तर मातृभाषेतील शिक्षण धोक्यात येणार आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ घोषणाबाजी आणि भावनिक आंदोलन पुरेसे नाही. मराठीच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने कृतिशील कार्यक्रम राबवावाच लागेल आणि त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली पाहिजे. मराठी शाळांचे बंद होणे, इमारती पाडणे, खासगीकरण आणि माध्यमांवर ठोस चर्चा आता झालीच पाहिजे. ठरवून बंद पाडलेल्या, पाडल्या जाणाऱ्या शाळा यावर गंभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

शिक्षणतज्ज्ञ शिक्षक सामाजिक कार्यकर्ते पालक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. मराठीचा कळवळा दाखवणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकतात. मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवल्या जाऊन त्याचे इंग्रजी शाळांच्या इमारतीत रूपांतर होऊन काही महिन्यातच चकचकीत स्वरूपात उभे राहतात हे ठरवून तर निर्माण केले जात नाही असे प्रश्न यानिमित्ताने पडत आहे. मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात देऊन बिल्डरांना देण्याचा आणि त्या जागांवर मॉल टॉवर उभारण्याचा प्रकार आज सर्वत्र राज्यभर सुरू आहे. इंग्रजी मराठी अशी तुलना करून मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी न येणाऱ्यांनाच मराठी आवडते या मानसिकतेतूनच आले आहे. आज प्रशासनातील काही अधिकारी राजकारण्यांना हाताशी धरून हे सर्व उद्योग करत आहे. मराठी भाषेतून शिकणे आणि शिक्षण हा सामाजिक नव्हे तर प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे.

आज राज्यातील प्रत्येक विभागात मराठी शाळांची विदारक स्थिती झाली आहे. विद्यार्थ्यांचे हाल आणि बिल्डर व प्रशासन यांचे साटेलोटे यातूनच आज मराठी व मराठी शाळेची ही दुर्दशा झाल्याचे दिसून येत आहे. त्याला पाल्य तरी बिचारी काय करणार. आज बाजारात स्पर्धा एवढी वाढली आहे, की प्रत्येक पाल्याला आपला मुलगा इंग्लिश मीडियममध्ये जाऊन तो फडफड इंग्लिश बोलावा असे वाटते. त्यात आता अगदी तळागाळातील वर्गालाही आपला मुलगा खूप शिकावा असे वाटते मात्र त्याला इंग्लिश माध्यमांशिवाय पर्याय नाही असे चित्र निर्माण केले जाते. मात्र मराठी माध्यमात शिकूनही मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या अनके व्यक्तींची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. गरज आहे ती फक्त मराठी माध्यमात शिकूनही इंग्रजी दमदार शिकण्याची. त्यासाठी शिकवणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. शाळेतही दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे. मात्र खरी बोंब तिथेच आहे.आज इंग्रजी शिकवणारे शिक्षक पाहिले, की धडकी भरते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच एखाद्या विषयाची गोडी लागली की पुढेही त्यांना ती सोपी जाते. मात्र आपल्याकडे लहानपणापासूनच इंग्रजी इतकी किचकट करून ठेवली जाते, की विद्यार्थ्यांना त्याची आवड लागत नाही. आता गरज आहे ती इंग्रजी सोपी करण्याची. त्यासाठी पाल्यांनी आता उगीचच बाऊ करण्यापेक्षा आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवण्यास भर दिल्यास मराठी शाळा टिकण्यास नक्कीच मदत होईल. - अल्पेश म्हात्रे

Comments
Add Comment