रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी शांततामय वातावरणात रोह्याच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडली. या मतमोजणीत राष्ट्रवादीने बाजी मारली असून, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या वनश्री समीर शेडगे या निवडून आल्या. नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या वनश्री समीर शेडगे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना यांचा ४,६९५ मतांनी पराभव केला. वनश्री शेडगे यांना एकूण ८,५८६ मतदान झाले, तर शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांना ३,८९१ मते मिळाली. २० जागांपैकी १८ जागांवर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निवडून आले असून, रोशन चाफेकर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. शिवसेना शिंदे गटाच्या सुप्रिया जाधव याही निवडून आल्या. प्रभाग क्र. १ मध्ये प्रशांत कडू आणि नीता हजारे, प्रभाग क्र २ मध्ये फराह पानसरे व राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्र.३ मध्ये अफरीन रोगे व अरबाज मनेर, प्रभाग क्र.४ मध्ये नेहा शिरीष अंबरे व हसन दर्जी, तर प्रभाग क्र ५ मध्ये अल्मास मुमेरे व महेंद्र गुजर, प्रभाग क्र.६ मध्ये गौरी बारटक्के व महेंद्र दिवेकर, प्रभाग क्र ७ मध्ये प्रियंका धनावडे व रवींद्र सुधीर चालके, प्रभाग क्र.८ मध्ये संजना शिंदे व महेश कोलाटकर, प्रभाग क्र ९मध्ये सुप्रिया जाधव (शिवसेना) व रोशन चाफेकर (भाजप), प्रभाग क्र १० मध्ये पूर्वा मोहिते व अजित जनार्दन मोरे हे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्र ९ वगळता सर्व प्रभागांमध्ये रा. पक्षाचे उमेदवार निवडून आले.






