Monday, December 22, 2025

अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व

अलिबाग नगरपालिकेवर  शेकाप-काँग्रेसचे वर्चस्व

अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या २ डिसेंबरला झालेल्या चुरशीच्या निवडणुकीनंतर आज रविवारी २१ डिसेंबरला झालेल्या मतमोजणीत अपेक्षेप्रमाणे अलिबाग नगरपालिकेवर शेकाप-काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या मतमोजणीत शेकाप-काँग्रेसला १७, उबाठा २, तर भाजपचे अंकित बंगेरा यांच्या रूपाने एक जागा मिळाली. या निवडणुकीत उबाठा आणि भाजपाने अलिबाग नगरपालिकेत यानिमित्ताने शिरकाव केला असून, नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक विजयी झाल्या.

शेकापच्या उमेदवार अक्षया नाईक यांनी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांचा सहा हजार ६४९ मतांनी पराभव केला. शेकापच्या उमेदवार अक्षया प्रशांत नाईक यांना ८ हजार ९७४, तर प्रतिस्पर्धी महायुतीच्या भाजपा उमेदवार तनुजा पेरेकर यांना अवघी २ हजार ३३४ मते मिळाली. नोटाला १९० मते मिळाली. प्रभाग एकमधून संतोष मधुकर गुरव (शेकाप), संध्या शैलेश पालवणकर (शेकाप), प्रभाग दोनमधून सुषमा नित्यानंद पाटील (शेकाप), प्रभाग तीनमधून डॉ. साक्षी गौतम पाटील (शेकाप), आनंद अशोक पाटील (शेकाप), प्रभाग चारमधून श्वेता संदीप पालकर (पाटील-उबाठा), संदीप जनार्दन पालकर (उबाठा), प्रभाग पाचमधून एडव्होकेट निवेदिता राजेंद्र वाघमारे (शेकाप), समीर मधुकर (हुनी) ठाकूर (काँग्रेस), प्रभाग सहामधून एडव्होकेट ऋषिकेश रमेश माळी (शेकाप), एडव्होकेट अश्विनी ऋषिकेश ठोसर (शेकाप), प्रभाग सातमधून एडव्होकेट मानसी म्हात्रे (शेकाप), एडव्होकेट अंकीत बंगेरा (भाजप), प्रभाग आठमधून एडव्होकेट निलम किशोर हजारे (शेकाप), अनिल रमेश चोपडा (शेकाप), प्रभाग नऊमधून योजना प्रदीप पाटील (शेकाप), सागर शिवनाथ भगत (शेकाप), प्रभाग दहामधून शैला शेषनाथ भगत (शेकाप), वृशाली महेश भगत (शेकाप) विजयी झाले.

अलिबाग शहरातील जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुलमध्ये आज सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, नायब तहसीलदार अजित टोळकर यांनी त्यांना साह्य केले. मतमोजणी केंद्राकडे जाणारे रस्ते अलिबाग पोलिसांनी बंद केले होते. याशिवाय मतमोजणी केंद्रालाही पोलिसांचा वेढा पडल्याचे दिसून आले. निकालानंतर शेकाप-काँग्रेस, उबाठातर्फे विजयी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

शेकाप -काँग्रेस १७, उबाठा २, भाजप १ जागा

नगराध्यक्षपदी शेकापच्या अक्षया नाईक

अलिबाग नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदी मी निवडून आल्याने मला खूप आनंद झाला असून, अलिबाग नगरीच्या विकासासाठी यापूर्वी शेकापच्या माध्यमातून अनेक प्रयत्न झाले आहेत. आता मी नगराध्यक्षपदी निवडून आल्याने माझ्या अन्य सहकाऱ्यांसह उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. -अक्षया प्रशांत नाईक (नवनिर्वाचित नगराध्यक्षा, अलिबाग नगरपालिका)

Comments
Add Comment