Sunday, December 21, 2025

कपटाचं यश तात्पुरतं

कपटाचं यश तात्पुरतं

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर

माणूस यश मिळवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबतो. काही जण प्रामाणिक परिश्रमाचा मार्ग निवडतात, तर काही जण कपट, फसवणूक आणि लबाडीचा. कपटानं मिळालेलं यश सुरुवातीला आकर्षक वाटत असलं, तरी ते टिकत नाही. कारण अशा यशाचा पाया खोटेपणावर उभा असतो.

कपटानं मिळालेलं यश काही काळ लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करू शकतं, पण सत्य कधीना कधी उघड होतंच. अशा वेळी केवळ यशच नाही तर विश्वास, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानही गमावला जातो. इतिहासात आणि आजच्या समाजात अशी अनेक उदाहरणे दिसतात की कपटाने वर गेलेली माणसे शेवटी खाली आली आहेत.

मना सांग पा रावण काय झाले? अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले| म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी। बळे लागला काळ हा पाठीलागी ॥ १३ ॥

मनाचे श्लोक

तुम्हाला चित्रपट पाहायला आवडते ना? तुम्हाला असा एकतरी चित्रपट ठाऊक आहे का? की ज्यामध्ये नायक पराभूत झाला आहे आणि खलनायक जिंकला आहे? प्रत्येक चित्रपटात खलनायकाची सगळी कारस्थाने नायक हाणून पाडतो. या जगात दुष्ट शक्ती कधीही यशस्वी होत नाहीत. दुसऱ्याला दुःख देऊन माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. सगळे सुखी असावेत ही वासना आपल्याला सुखी बनवेल, कारण या सर्वांमध्ये आपण आलोच. दुष्ट शक्तींचासुद्धा तात्पुरत्या विजयाचा कालखंड असतो.

रावणानेदेखील सगळ्या देवांवर विजय मिळवला. त्यांना तुरुंगात टाकले. नोकराप्रमाणे देवांना राबवून घेतले; परंतु रावणाचा शेवट अतिशय वाईट झाला. विशेष म्हणजे रावण एकटा मेला नाही तर रावणाचे समर्थन करणारे त्याचे सर्व पाठीराखेदेखील मरण पावले. चित्रपटात फक्त खलनायक मरतो असे नाही तर खलनायकाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्ती मरण पावतात.

शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेब बादशाह सुमारे सात लाख फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. शिवाजी महाराज हयात नाहीत, संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून ठार मारले, राजाराम महाराजांना तुरुंगात टाकले. शेवटी ते मरण पावले. शाहू महाराजही तुरुंगात पडले. पंचवीस वर्षे मोगल सैन्य महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण औरंगजेब अपयशी झाला. शेवटी तो महाराष्ट्रातच आपल्या मरणाने मरण पावला.

उलट एक दिवस संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाच्या छावणीचे तीन सोन्याचे कळस कापून आणले. पांडवांना नष्ट करण्यासाठी दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीमामा यांनी आयुष्यभर नाना प्रयत्न केले. वेगवेगळी कपट कारस्थानं केली. त्यांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. पांडवांना वनवासात पाठवले. ते अज्ञातवासात असताना त्यांना पुन्हा शोधण्याचा प्रयत्न केला. राज्य पांडवांचे असूनही सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनदेखील मिळणार नाही, असे दुर्योधनाने मोठ्या गर्वाने सांगितले; परंतु महाभारत युद्धाचा शेवट काय झाला? सारेच्या सारे कौरव मारले गेले आणि हस्तिनापूरचे साम्राज्य पांडवांना मिळाले.

ठरवून करून तात्पुरते यश मिळू शकते, पण कायमचे यश मिळवण्यासाठी त्याग आणि प्रेम यांचाच मार्ग धरावा लागेल. प्रामाणिकपणा, सचोटी आणि कष्ट यांवर मिळालेले यश हळू मिळालं, तरी ते टिकाऊ असतं. ते माणसाला आत्मसन्मान देतं आणि समाजात विश्वास निर्माण करतं. म्हणूनच जीवनात यश मिळवताना मार्ग योग्य असणं महत्त्वाचं-कपटाचं यश तात्पुरतं.

Comments
Add Comment