Sunday, December 21, 2025

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

धनंजय बोडके

नाशिक जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निकालात शिवसेनेला सर्वाधिक ५ जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही. जिल्ह्यात सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ तीन ठिकाणी समाधान मानावे लागले. तर नांदगाव येथील शिवसेना आमदाराच्या मतदारसंघातील दोन्ही जागांसह सटाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे नगराध्यक्ष निवडून आणत शिवसेनेने जिल्ह्यात आपली सरशी सिद्ध केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने एकप्रकारे राष्ट्रवादी आणि भाजपला इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीने जिल्ह्यात विजयी घोडदौड केली आहे. येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि ओझर पिंपळगाव येथे शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना रंगला होता. या ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला.

नांदगाव आणि मनमाड येथे आमदार सुहास कांदे यांनी आपले वर्चस्व कायम राखत दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणले. या ठिकाणी भाजपने उमेदवार न दिल्याने शिवसेनेला फायदा झाला. ऐनवेळी भाजपने उमेदवार न दिल्यामुळे भाजपातील इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. येवल्यात मंत्री छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांनी, तर सिन्नरमध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपापले गड शाबूत ठेवले. नांदगाव व मनमाड येथे शिवसेना आमदार सुहास कांदे, तर चांदवडमध्ये भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांचे उमेदवार विजयी झाले. सटाण्यात मात्र भाजप आमदार दिलीप बोरसे यांचा उमेदवार पराभूत झाला आणि शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली. प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांना जबर धक्का बसला असून येथे भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला. ओझर व पिंपळगाव बसवंत येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल्याने निफाड विधानसभा मतदारसंघात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. भगूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, तर त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथे शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरले. विरोधी महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सपशेल पराभव झाला आहे.

भाजपाची रणनीती ठरली कमकुवत

सिन्नर येथे भाजपने उशिरा रणनीती आखल्याचा फटका बसला. आयात उमेदवारांवर अधिक भर दिल्याने पराभव पत्करावा लागला. त्र्यंबकेश्वर येथे अति आत्मविश्वास भाजपच्या पराभवाचे कारण ठरला. सटाण्यात मागील वेळी भाजपचा नगराध्यक्ष असतानाही यावेळी सातत्य राखता आले नाही. पिंपळगाव बसवंत व ओझर येथे आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसल्याने भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांचे नेतृत्व पुढे आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत निफाडमधून यतीन कदम भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

भगूरला २५ वर्षांनंतर सत्तांतर

भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि भाजप हे सर्व पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र लढले होते. या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. भगूर नगरपरिषदेत गेल्या २५ वर्षांपासून विजय करंजकर यांची एकहाती सत्ता होती. अनिता करंजकर यांचा १,९१३ मतांनी पराभव करत प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या. शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी होऊ नये यासाठी भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.

भाजपाच्या ग्रामीण संघटनात्मक बांधणीत त्रुटी; अंतर्गत वाद

राज्यात सर्वत्र भाजपचा विजय होत असताना नाशिक जिल्ह्यात पक्ष काहीसा मागे पडल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील संघटनात्मक बांधणी कमकुवत ठरली. तसेच पक्षातील अंतर्गत वादही पराभवाला कारणीभूत ठरले.जिल्ह्यात आमदार राहुल आहेर वगळता प्रभावी नेतृत्वाचा अभाव दिसून आला. इतर जिल्ह्यातील मंत्र्यांनी ऐनवेळी आपल्या पक्षातील उमेदवारांना संधी न देता आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने भाजपला मोठा फटका बसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment