Sunday, December 21, 2025

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची दुसरी महत्त्वाची फेरी शुक्रवारी पार पडली. काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये एकमत साधले गेले असले तरी महत्त्वाच्या प्रभागांवर मोठ्या वाटाघाटी सुरू असल्याचे समोर आले आहे. भाजपने ५० जागांची मागणी केली असल्याने युतीचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात पेच निर्माण झाला आहे. माहितीनुसार, भाजपने मध्यवर्ती भागासह वागळे इस्टेट, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर यांसारख्या महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये अधिक जागांची मागणी केली आहे. सध्या भाजपकडे महापालिकेत २४ नगरसेवक आहेत, निवडणुकीत आपला विस्तार वाढवण्यासाठी त्यांनी थेट ५० जागांचा आकडा मागितला आहे.

दुसरीकडे शिंदे सेनेकडे सद्यस्थितीत ७९ नगरसेवकांचे बलाढ्य संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला ५० जागा मिळणे म्हणजे शिंदे गटासाठी विद्यमान जागांवर पाणी सोडण्यासारखे होईल, असे स्थानिक नेते मानतात. बैठकीत काही जागांवर जोरदार दावे-प्रतिदावे झाल्याचे समजते. हा तिढा आता वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, पूर्वेश सरनाईक, हणमंत जगदाळे तर भाजपकडून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, शहर अध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघुले उपस्थित होते.

आमदार संजय केळकर म्हणाले, "जागावाटपाची दुसरी फेरी पूर्ण झाली असून कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेत आहोत. राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि महायुतीचा भगवा फडकवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. येत्या एक-दोन दिवसांत सर्व प्रश्न सुटतील." खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "महायुती म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहोत. सोमवारपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईल." आमदार निरंजन डावखरे यांनीही सांगितले, "आमच्यात कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नाही, आम्ही 'जुळे भाऊ' आहोत. आगामी निवडणुकीत महायुतीचे ११० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास आहे."

राजकीय वर्तुळाचे लक्ष आता सोमवारी होणाऱ्या अंतिम जागावाटपावर लागले आहे, ज्यामध्ये भाजपच्या मागितलेल्या ५० जागांपैकी प्रत्यक्षात किती त्यांना मिळतात आणि शिंदे गट आपले बालेकिल्ले कसे राखतो, हे ठरणार आहे.

Comments
Add Comment