Sunday, December 21, 2025

संस्कार

संस्कार

स्नेहधारा : पूनम राणे

उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारची वेळ होती. सूर्य आग ओकत होता. उकाड्याने अंगाची लाही-लाही झाली होती. जमिनीला उष्णतेने भेगा पडल्या होत्या. मनुष्यमात्राच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जीवनाला मरगळ आली होती. विद्यार्थ्यांची शाळाही सुटली होती. काही मुले डोक्यावर रुमाल, तर काही छत्री, तर काही विद्यार्थी टोपी घालून शाळेच्या बाहेर पडले होते. शाळेपासून थोड्या अंतरावर एक सिग्नल होते. त्या सिग्नलवर एक टेम्पो आणि बाईकस्वार यांची जोरदार धडक झाली आणि थेट बाईकस्वार खाली कोसळला. त्याच्या हाता-पायाला जबरदस्त मार लागला होता. तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

शाळेतील राहुल, अनिकेत, सोहम, संकेत हे चार विद्यार्थी त्या दिशेने धावत सुटले. बाईकवरील तरुणाच्या पाठीवरील सामान चोहीकडे विखुरले होते. घड्याळ, मोबाईल एकीकडे पडले होते. तो बेशुद्ध होऊन एका बाजूला पडला होता. सोहमने ताबडतोब आपल्या दप्तरातून पाण्याची बाटली काढून त्यातील पाणी बाईकस्वारच्या चेहऱ्यावर शिंपडले. अनिकेतने ताबडतोब विखुरलेले सामान जमा केले. सोहमने मदतीसाठी दिसणाऱ्या प्रत्येकाकडे धाव घेतली. बघता बघता तरुणाच्या सभोवती सारा जमाव गोळा झाला. एका बाजूला त्याचे घड्याळ व मोबाईल पडला होता. घड्याळ व मोबाईल घेऊन एक व्यक्ती तिथून धावत सुटली. संकेतने पाहिले व तो त्याच्या मागून धावत सुटला. त्याने त्याला पकडले हे पाहून सारा जमाव संकेत आणि त्या अनोळख्या व्यक्तीपाशी गोळा झाला.

जमावातील काही जणांनी त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात पोलिसांची गाडी आली. टेम्पोचालकाला जमावाने चांगलेच मारले होते. खरं तर तो भर दुपारी दारू पिऊन टेम्पो चालवत होता. वाहतुकीचे सारे नियम त्यांने धाब्यावर बसवले होते. त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करून संकेत बाईकस्वारच्या जवळ आला. पोलिसांना मोबाईल मिळताच त्यातील काही एक-दोन नंबर लावून जखमी तरुणाच्या नातेवाइकांना संपर्क साधला. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत नातेवाईक हजर झाले. त्यांना तिथे घडलेल्या साऱ्या परिस्थितीची कल्पना देण्यात आली. तिथे जमलेल्या जमावाने या चारही मुलांचे कौतुक केले. खरं तर त्यांना आज घरी जायला उशीर झाला होता. आई-वडील फार चिंतेत होते. नेहमी आपली मुलं दीड वाजता घरी येतात; परंतु आज चक्क अडीच वाजले होते म्हणून प्रत्येकाचे आई-वडील काळजीत पडले होते; परंतु आपल्या मुलांना समोर पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वप्रथम चारही जणांचे पालक त्यांच्यावर ओरडले, संतापले; परंतु खरी हकीगत समजतात त्यांना आपल्या मुलांचा फार गर्व वाटला. आपण केलेल्या चांगल्या संस्काराची त्यांना जाणीव झाली. त्यांचे मन भरून आले. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर प्रार्थनेच्या वेळेस मूल्य शिक्षणाच्या तासाला चारही विद्यार्थ्यांनी घडलेला प्रसंग सर्व विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांच्या कार्याचे शाळेच्या मुख्याध्यापकानी कौतुक केले. या विद्यार्थ्यांप्रमाणेच आपणही आपल्या भावी जीवनात अशा प्रकारचे कार्य करावे असा संदेश मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला .

तात्पर्य:- आपण आपल्या चांगल्या गुणांनी कर्माने आपलं स्वतःचं, आपल्या देशाचं, आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करायचे असते. मोठेपणाची बीज छोटेपणातच आकाराला येत असतात हेच खरे.

Comments
Add Comment