४४० नवी पदनिर्मिती; निरस्त पदांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य
कणकवली : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती होईल आणि विभागाची कामकाज क्षमता वाढेल.
सुधारित आकृतिबंधानुसार, एकूण १ हजार ३९७ पदे निश्चित करण्यात आली आहेत. यात १ हजार ५९ नियमित पदे आणि ३३८ बाह्य स्रोतातील पदांचा समावेश आहे. मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर या आकृतिबंधाकडे विशेषत्वाने लक्ष दिले होते. २००७ नंतर प्रथमच कर्मचारी भरती करण्याचा हा आकृतिबंध या खात्यात मंजूर झाला आहे.
मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने ऑक्टोबर २०२५ मध्ये याला मंजुरी दिली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या ११ डिसेंबर २०२५ च्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
पूर्वी विभागात १ हजार ५० पदे मंजूर होती. त्यातील ८२ पदे २०२३ मध्ये रद्द करण्यात आली होती. आता उरलेल्या ९६८ पैकी ११ पदे रद्द करून, ४४० नवीन पदे (३८० नियमित आणि ६० बाह्य स्रोत) मंजूर करण्यात आली आहेत.
यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाची एकूण मनुष्यबळ संख्या १ हजार ३९७ पर्यंत पोहोचली.
एकूण ३३८ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरणार
काही पदे बाह्य यंत्रणा किंवा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. यात सहआयुक्त (२), विधी अधिकारी (१), वाहनचालक (५२), मत्स्यक्षेत्रिक (९९), शिपाई (१७०), सुरक्षा रक्षक (८) आदींचा समावेश आहे. अशी एकूण ३३८ पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जातील. या पदांसाठी मासिक एकत्रित वेतन १५ हजार ते ७० हजार रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. निरस्त पदांवरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन, उर्वरित जागा बाह्य स्रोताने भरल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.






