महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
माहाभारत युद्ध हे कौरव-पांडवांमध्ये लढले गेले. कौरव-पांडवांमधील प्रमुख व्यक्तिरेखांची माहिती सर्वांनाच आहे. याशिवाय महाभारतामध्ये भगदत्त, धृष्टद्यूम्न, सात्यकी, बार्बरीक यासारखे अनेक रथी, महारथी, योद्धे, महायोद्धे होते. त्यापैकीच एक योद्धा होता भुरिश्रवा! हस्तीनापूर राज्यातील एका छोट्या राज्याचा बहलिक हा राजा होता. त्या राजाचा पुत्र होता सोमदत्त.
श्रीकृष्णाची माता देवकी हिच्या स्वयंवराच्या वेळी वसुदेवाच्या वडिलांचा एक सीनी (शिनी) नावाचा चुलता व सोमदत्त यांचे दोघांमध्ये युद्ध झाले. या युद्धात सीनीने सोमदत्तचा पराभव करून त्याला सर्वांसमोर फरपटत आणून, अपमानित करून, लाथ मारून सोडून दिले.
हा अपमान जिव्हारी लागल्याने सोमदत्ताने भगवान शिवाची आराधना केली व एका पराक्रमी अपत्त्याचे वरदान मागितले. वरदानाप्रमाणेच सोमदत्तला मुलगा झाला त्याचेच नाव भूरिश्रवा. अनेक ठिकाणी याचा उल्लेख भरिश्रवसा भुरिश्रवास असाही आढळतो.
कौरव पांडव वादाच्या प्रसंगी भुरिश्रवाने नेहमीच कौरवांना समेटाचाच सल्ला दिला; परंतु युद्ध निश्चिती झाल्यानंतर हा आपल्या सैन्यासह कौरवांच्या बाजूने युद्धात उतरला. कौरवांच्या अनेक सेनापतींपैकी भुरिश्रवा एक सेनापती होता. महायुद्धात जेव्हा जेव्हा भुरिश्रवा व सात्यकिचा सामना झाला तेव्हा भुरिश्ववाने सात्यकीला पराभूत केले. भुरिश्रवाने युद्धात सात्यकीच्या दहाही पुत्रांना ठार केले. भुरिश्रवाला प्रतीप व प्रत्यंज नावाची दोन मुले होती. त्यांना महायुद्धात अभिमन्यूने ठार केले. जेव्हा अभिमन्यूला अनेकांनी घेरून ठार केले, तेव्हा अर्जुनाने जयद्रथाला ठार करण्याची प्रतिज्ञा केली. त्यावेळेस जयद्रथाचा बचाव करणाऱ्यांमध्ये भुरिश्रवाही होता. अर्जुन भीम व सात्यकी यांच्या सहकार्याने पुढे सरकत होता. तेव्हा भुरिश्रवाने सात्यकीला युद्धाचे आव्हान केले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. भुरिश्रवाने सात्यकीचे रथ मोडून व घोडे मारून त्याला पायदळ केले व बेशुद्ध झालेल्या सात्यकीला फरपटत आणून, लाथ मारून पित्याच्या अपमानाचा बदला घेतला. तो तलवार उपसून सात्यकीला ठार करण्याच्या प्रयत्नात असतानाच अर्जुनाने बाण मारून त्याचा तलवारीसह हात तोडला. तेव्हा पूर्व सूचना न देता आपल्याला बाण मारून हात तोडल्याबद्दल भुरिश्रवाने अर्जुनाची निंदा केली व हा अधर्म असल्याची जाणीव दिली.
तेव्हा अर्जुनाने त्याला नि:शस्त्र अभिमन्यूच्या वधाच्या वेळेची आठवण करून दिली तसेच बेशुद्ध व नि:शस्त्र असलेल्या सात्यकीला ठार मारण्याचा प्रयत्न करणे हाही अधर्म आहे याची जाणीव करून दिली. तेव्हा भुरिश्रवा खजील झाला व आत्मग्लानिमुळे युद्धभूमीतच ध्यानधारणेत बसला. तोपर्यंत बेशुद्ध पडलेला सात्यकी शुद्धीवर आला व त्याने तलवारीच्या साह्याने भुरिश्रवाचे शीर उडविले. याच घटनेचा पुढे प्रभास क्षेत्री यादवच्या मेळाव्यात कृतवर्माने उल्लेख करून सात्यकीला अपमानित केले व अवहेलना केली. तेव्हा सात्यकी व कृतवर्मा यांच्यात वादावादी होऊन युद्ध झाले व सात्यकीने कृतवर्माला ठार केले. त्यातूनच सर्व यादवांमध्ये आपसात वादावादी व मारामारी होऊन कृष्ण बलराम व अन्य एक-दोन यादव वगळता सर्व यादवांचा नाश झाला असा उल्लेख पुराणात आहे.
हरियाणात कुरुक्षेत्रपासून २२ किलोमीटर अंतरावर भोर सैंद नावाचे गाव भुरिश्रवाच्या नावावरून पडल्याचा समज आहे.






