Saturday, December 20, 2025

एकांकिकांचे विश्व आणि बोलीभाषांचे प्रयोग...!

एकांकिकांचे विश्व आणि बोलीभाषांचे प्रयोग...!

राजरंग : राज चिंचणकर

मराठी नाट्यसृष्टीच्या अवकाशात एकांकिका स्पर्धांचे वेगळे विश्व सामावलेले आहे. एकांकिका स्पर्धांचे हे व्यासपीठ नवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींसाठी महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांतूनच अनेक युवा रंगकर्मी रंगभूमीवर येत असतात. महाराष्ट्रात संपूर्ण वर्षभरात अनेक एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच एकांकिकांच्या दुनियेत २०१६ या वर्षी एक अनोखा प्रयोग केला गेला आणि तो म्हणजे बोलीभाषा एकांकिका स्पर्धांचा...! 'बोलीभाषा' हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू होता आणि याद्वारे महाराष्ट्रातल्या विविध बोलीभाषांचे चांदणे रंगभूमीवर दृश्यमान झाले. यानिमित्ताने, महाराष्ट्राच्या खेडोपाडी संवादाचे माध्यम असलेल्या बोलीभाषा रंगमंचावर आल्या आणि शहरी भागातल्या रसिकांना या बोलीभाषांची ओळख झाली.

मराठी रंगभूमीवर एकेकाळी 'वस्त्रहरण' या नाटकाने धुमशान घातले होते. या नाटकाची अनेक वैशिष्ट्ये असली, तरी या नाटकात वापरली गेलेली बोलीभाषा महत्त्वाची ठरली आणि तिने या नाटकाला खास रुची बहाल केली. या नाटकाचे कर्ताकरविता गंगाराम गवाणकर यांची बोलीभाषेवर विशेष माया होती आणि त्यांनी रचलेल्या या नाटकात त्याचे पुरेपूर प्रतिबिंब पडले होते. आता 'वस्त्रहरण'कारांचा संदर्भ यात द्यायचे कारणही तसेच आहे. सध्या नाट्यसृष्टीत गाजत असलेली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा केवळ त्यांच्या निमित्तानेच रंगभूमीवर मूर्त स्वरूपात अवतरलेली आहे.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढ 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर यांच्या एका भाषणाने रोवली गेली आहे. ठाणे येथे ९६ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. गंगाराम गवाणकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात, त्यांनी नाट्यसृष्टीत केलेल्या कार्याचे आणि यशाचे श्रेय बोलीभाषेतल्या त्यांच्या 'वस्त्रहरण' या गाजलेल्या नाटकाला दिले होते. बोलीभाषेबद्दल बोलताना त्यांनी त्यावेळी, बोलीभाषेतली नाटके रंगभूमीवर यायला हवीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. वास्तविक, यानंतर हा विषय तिथेच संपला असता. पण तसे झाले नाही. कारण त्यांच्या या भाषणातून प्रत्यक्ष काहीतरी घडणे विधिलिखित होते. त्यावेळी तिथे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण उपस्थित होते आणि त्यांनी गंगाराम गवाणकर यांच्या त्या अपेक्षेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे ठरवले.

मराठी नाट्यसृष्टी अनेक नाट्यनिर्मात्यांनी गाजवली आणि त्यातलेच एक नाव म्हणजे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण. त्यांनी त्यांच्या 'सुप्रिया प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची नाटके रंगभूमीला दिली. 'यू टर्न', 'हिमालयाची सावली', 'कथा', 'चॉईस इज युवर्स', 'दुधावरची साय', 'टाइम प्लीज', 'यू टर्न २', 'मदर्स डे', 'जाऊ द्या ना भाई' अशी अनेक नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली. त्यांचे 'यू टर्न' हे नाटक रंगभूमीवर खूप गाजले. 'नाट्य निर्माता' म्हणून गोविंद चव्हाण यांना या नाटकाने खरी ओळख मिळवून दिली. रंगभूमीवर अनेक उदयोन्मुख युवा कलाकारांना या नाट्यसंस्थेने प्रकाशात आणले. याच गोविंद चव्हाण यांच्या कानी गंगाराम गवाणकर यांचे 'ते भाषण' पडल्यावर त्यांच्या मनात बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची संकल्पना चमकून गेली आणि त्यांनी तिला मूर्त स्वरूप देण्याचे नक्की केले. या पार्श्वभूमीवर, सन २०१६ या वर्षी त्यांनी बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. एक राज्यस्तरीय आगळीवेगळी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा भरवून आपली बोली आणि संस्कृती जपण्याची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. 'हृदयाची भाषा बोलीभाषा' ही या एकांकिका स्पर्धेची टॅग-लाईन...! या स्पर्धेला पहिल्या वर्षापासूनच रंगकर्मींचा उत्तम प्रतिसाद मिळत गेला.

त्यानंतर चार वर्षे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू होती; मात्र नंतरच्या काळात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावात गोविंद चव्हाण यांचे निधन झाले. स्पर्धेचा कर्ताच काळाच्या पडद्याआड गेल्यावर, यापुढे ही स्पर्धा खंडित होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण गोविंद चव्हाण यांची कन्या सुप्रिया चव्हाण हिने एकूणच बांधिलकी लक्षात घेऊन ही स्पर्धा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यंदा या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे नववे वर्षं आहे. आतापर्यंत या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा केंद्रबिंदू मुंबई हाच होता. पण यंदाच्या वर्षापासून मुंबईसह नागपूर येथे सुद्धा ही स्पर्धा घेण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी १९ व २० डिसेंबर रोजी मुंबईत आणि २७ डिसेंबर रोजी नागपूर अशा दोन केंद्रांवर होत आहे. अंतिम फेरी येत्या जानेवारी महिन्यात मुंबईत रंगणार आहे. या स्पर्धेच्या गेल्या आठ वर्षांच्या काळात तब्बल ४०० हून अधिक नाट्यसंघ यात सहभागी झाले आहेत. पूर्णपणे मराठीच्या प्रादेशिक बोलीभाषांवर आधारित अशी ही एकमेव एकांकिका स्पर्धा आहे.

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मालवणी, कोकणी, घाटी, वऱ्हाडी, आगरी, कोळी, सातारी, खानदेशी, झाडी आदी मराठीच्या जवळजवळ ५६ बोलीभाषा महाराष्ट्राच्या विविध प्रांतांमध्ये बोलल्या जातात. या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. या स्पर्धेत पारितोषिके देतानाही, ज्येष्ठ रंगकर्मींच्या स्मृतींची जपणूक करत त्यांच्या स्मरणार्थ पारितोषिके दिली जातात. हीच स्पर्धा आता दशकाच्या मार्गावर वाट चालू लागली आहे. मराठी बोलीभाषा आणि नाट्यसृष्टीसाठी ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होताना सुप्रिया चव्हाण म्हणते, "सन २००० ते २०२२ या काळात 'सुप्रिया प्रॉडक्शन'ने उत्तमोत्तम नाट्यकृती रंगभूमीला दिल्या. या २२ वर्षांमध्ये मला खूप काही शिकायला मिळाले. बोलीभाषा एकांकिका स्पर्धा सन २०१६ पासून आम्ही सुरू केली. सन २०२० या वर्षी बाबा आम्हाला सोडून गेले; पण त्यांच्या नाट्यसृष्टीवरच्या प्रेमाने आणि आमच्यावरच्या आशीर्वादाने आमची संस्था आजही काम करत आहे. यापुढेही याच जोमाने नवीन आव्हाने स्वीकारत आम्ही काम करत राहू".

Comments
Add Comment