पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे. स्वारगेट-महाबळेश्वर-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई वातानुकूलित बसच्या एकूण चार फेऱ्या नियोजित आहेत. स्वारगेटला सकाळी साडेपाच, साडेसहा तर दुपारी ३, ४ वाजता बस सुटणार आहे. महाबळेश्वर येथून सकाळी ९, १० तर सायंकाळी साडेसहा, साडेसात वाजता परतीच्या फेऱ्या असतील. आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. आरक्षणासाठी एमएसआरटीसीचे अधिकृत मोबाईल ॲप तसेच https://npublic.msrtcors.com/ या संकेतस्थळावर सोय उपलब्ध आहे. या बसमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत असून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य बस प्रवास उपलब्ध आहे. पर्यटकांकडून सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. खासगी वाहनांचा खर्च टाळून कमी दरात आरामदायी, पर्यावरण पूरक प्रवासाचा आनंद प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.