Saturday, December 20, 2025

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

'महाविस्तार ॲप' जिल्ह्यातील शिवारात क्रांती घडविणार

कृषी विभागाचा एआय तंत्रज्ञानावर विशेष भर ; १८ हजार वापरकर्ते

अलिबाग : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महाविस्तार अॅप कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवत आहे. हे महाविस्तार अॅप सध्या शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असून, रायगड जिल्ह्यातील १८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी याचा वापर करीत शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची कास धरली आहे.

हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत चालले आहे. या अॅपचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचाही दिवसेंदिवस कल वाढत चालला असून, त्यामुळे हे महाविस्तार अॅप कृषी क्रांतीत शेतकऱ्यांचा डिजिटल फ्रेंड बनले आहे, या अॅपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक सल्ले देत त्यावर विविध उपाययोजना सांगून कृषी क्रांतीत आमूलाग्र बदल घडवला जात आहे. रायगड जिल्ह्यातील १८ हजार ६४५ शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. रोहा तालुक्यात सर्वाधिक १ हजार ९८० शेतकरी याचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे अॅप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे अॅप कार्यान्वित झाले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृद आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक, माहितीपूर्ण व्हिडीओ आणि शेतीशाळा, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आदींची इत्यंभुत माहिती आणि कृषीविषयक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

अॅपविषयी अधिक माहिती

शेतकऱ्यांना वापर करण्याच्या दृष्टीने हे अॅप सुलभ व सोपे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन महाविस्तार एआय अॅप डाउनलोड करता येतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करावा म्हणून कृषी विभागातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शेतकऱ्यांनी या अॅपचा वापर करून कृषी क्षेत्रातील या डिजिटल क्रांतीत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे महाविस्तार एआय हे अॅप शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असून, शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे.

Comments
Add Comment