Saturday, December 20, 2025

कर संकलनामध्ये भारताची विक्रमी झेप, सरकारच्या तिजोरीत १७.०४ लाख कोटी जमा

कर संकलनामध्ये भारताची विक्रमी झेप, सरकारच्या तिजोरीत १७.०४ लाख कोटी जमा

नवी दिल्ली  : चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी देशाच्या दिलासादायक बातमी आहे. १ एप्रिल ते १७ डिसेंबर या कालावधीत भारताच्या प्रत्यक्ष करसंकलनात ८ टक्क्यांची वाढ झाली असून, एकूण महसूल १७.०४ लाख कोटी रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, यंदा प्राप्तिकर परतावा देण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे निव्वळ करसंकलनाचा आकडा उंचावलेला दिसत आहे.

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात ८.१७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कंपनी कर आणि सुमारे ८.४७ लाख कोटी रुपयांच्या वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत भांडवली रोखे कर अर्थात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) मधून मिळणारा निव्वळ महसूल ४०,१९५ कोटी रुपये होता.

गेल्या वर्षाच्या तुलनेत प्राप्तिकर परतावा देण्याचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी होऊन २.९७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिले आहे. प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार, परतावा समायोजित करण्यापूर्वी, एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १७ डिसेंबरपर्यंत ४.१६ टक्के वाढ नोंदवली गेली आणि ते २०.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) २५.२० लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे, जो वार्षिक आधारावर १२.७ टक्क्यांनी अधिक आहे. मात्र संकलनात आतापर्यंतची वाढ पाहता, ते निर्धारित लक्ष्य ओलांडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सरकारचे ‘एसटीटी’मधून ७८,००० कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट आहे.

Comments
Add Comment