Wednesday, January 7, 2026

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या प्रकरणात जबरदस्त धक्का बसला आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (FIA) विशेष न्यायालयाने तोशाखाना-II भ्रष्टाचार प्रकरणात दोघांनाही १७-१७ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

हे प्रकरण २०२१ मधील आहे, जेव्हा सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने इम्रान खान यांना एक अत्यंत महागडा 'बुल्गारी ज्वेलरी सेट' भेट म्हणून दिला होता. नियमानुसार, अशा महागड्या भेटवस्तू सरकारी तोशाखान्यात जमा करणे किंवा त्यांची वाजवी किंमत मोजून स्वतःकडे ठेवणे बंधनकारक असते. तपासात असे समोर आले की, या दागिन्यांची मूळ किंमत ७ कोटी १५ लाख पाकिस्तानी रुपये होती, मात्र इम्रान खान यांनी ती अवघ्या ५८ लाख रुपयांमध्ये विकत घेऊन नियमांचे उल्लंघन केले. न्यायालयाने याला सरकारी विश्वासार्हतेशी केलेली फसवणूक आणि भ्रष्ट आचरण मानले आहे. विशेष न्यायाधीश शाहरुख अर्जुमंद यांनी रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये तयार केलेल्या विशेष कोर्ट रूममध्ये हा निकाल दिला. इम्रान खान यांना गुन्हेगारी विश्वासघातासाठी १० वर्षे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ७ वर्षे अशा एकूण १७ वर्षांच्या शिक्षेची सुनावणी झाली. याशिवाय, दोघांवर १ कोटी ६४ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ

इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून विविध गुन्ह्यांखाली तुरुंगात आहेत. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये अल-कादिर ट्रस्ट प्रकरणातही त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती. तोशाखाना-१ प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती, मात्र आता तोशाखाना-२ मध्ये सुनावलेल्या या मोठ्या शिक्षेमुळे त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >