वार्तापत्र : विदर्भ
सध्या चारही महानगरपालिकांमध्ये युती किंवा आघाडी कशी होणार यावरच खल सुरू असलेले दिसत आहे. त्याचबरोबर उमेदवार निवडीसाठी वेगात हालचाली सुरू असलेल्या दिसून येत आहेत. चारही पालिकांमधील प्रमुख नेते आता कामाला लागलेले दिसत आहेत. प्रचारात स्थानिक नेत्यांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, आशीष जयस्वाल आदी सर्वच सक्रिय झालेले दिसतील.
रविवार १४ डिसेंबर रोजी नागपुरातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आणि लगेचच सोमवारी १५ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्र परिषद घेऊन महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. या २९ महानगरपालिकांमध्ये विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चार महानगरपालिका समावेश आहे. त्यामुळे आता विदर्भातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झालेली आहे.
या चार महानगरपालिकांमध्ये नागपूर महानगरपालिका सर्वात जुनी महानगरपालिका आहे. इथे १५१ वाॅर्ड असून आता ते ३८ प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. नागपुरात २०१७ मध्ये भाजप पक्षाची सत्ता होती. त्याआधी देखील २०१२ आणि २००७ मध्ये भाजपचीच सत्ता नागपुरात आली होती. मात्र या वेळी त्यांना कुणाशी तरी युती करून सत्ता मिळवावी लागली होती. २०१७ मध्ये मात्र भाजपला १०८ जागांवर घसघशीत बहुमत मिळाले होते. यावेळी तेच बहुमत कायम ठेवण्याचे आव्हान भाजप समोर राहणार आहे. नागपुरात एकूण २४.८२ लाख मतदार मतदान करणार असून त्यात १२ लाख २६ हजार पुरुष, तर १२ लाख ५६ हजार महिला आणि इतर २५६ अशी संख्या राहणार आहे. नागपूर महापालिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत.
अमरावती महानगरपालिकेत ८७ जागांसाठी निवडणूक होणार असून या जागा २२ प्रभागांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. इथे जवळपास ६.५० लाख मतदान आपला हक्क बजावणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत १७ प्रभाग असून निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या ६६ इतकी आहे. एकूण मतदार २ लाख ९९ हजार ९४४ इतके आहेत. यात १ लाख ४१ हजार ६०९ पुरुष, १ लाख ५० हजार ३५४ महिला आणि अन्य ३१ जणांचा समावेश राहणार आहे. इथे सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या प्रतिष्ठेचा फैसला होणार आहे. अकोला महानगरपालिकेत ८० जागा असून त्या २० प्रभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. इथे ५ लाख ५० हजार ६० मतदार असून यात २ लाख ७४ हजार ८७७ पुरुष, तर २ लाख ७५ हजार १४१ महिला मतदारांचा समावेश आहे.
विदर्भाचा राजकीय आलेख बघितल्यास इथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. बाकी शिवसेनेला इथे फारसे अस्तित्व नाही. तीच अवस्था शिवसेना ठाकरे गटाची देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर अक्षरशः दिवा घेऊनच शोधावे लागतात. अजित पवार गटाची देखील अवस्था तशीच आहे. त्यामुळे इथे खरी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांतच होईल असे चित्र
दिसते आहे. इथे नागपुरात २०१७ मध्ये भाजपने १५१ पैकी १०८ जागांवर विजय मिळवला होता, तर अमरावतीत ८७ पैकी ४५ जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली होती. अकोल्यात देखील २०१७ मध्ये ८९ पैकी ४८ जागा मिळवून भाजपने सत्ता आपल्याकडे खेचून आणली होती. चंद्रपुरात २०१७ मध्ये भाजपने ३६ जागा मिळवून सत्ता राखली होती. हे बघता या चारही महानगरपालिकांमध्ये भाजपचेच वर्चस्व स्पष्ट दिसते आहे. हे वर्चस्व कायम राखण्यासाठी आता भाजपचे सर्वच दिग्गज आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. तर काँग्रेस पक्षाचे सर्व दिग्गज भाजपला पराभूत कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
यावेळी नागपुरात भाजपच्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मोहन मते, प्रवीण दाटके, कृष्णा खोपडे आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सर्व हेवीवेट नेत्यांसमोर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत हे दोघे दंड थोपटून उभे राहणार आहेत. नागपुरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्हीही आपली फारशी ताकद नसताना देखील मित्रपक्ष भाजपला अडवून जास्तीत जास्त जागा कशा पदरात पाडून घेता येतील या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. बाकी वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारिप बहुजन महासंघ तसेच शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे फारसे अस्तित्व या निवडणुकीत जाणवणार नाही, हे आजचे चित्र आहे.
चंद्रपुरात आधी भाजपचीच सत्ता असल्यामुळे ती टिकवण्याचे भाजप समोर आव्हान राहणार आहे. भाजपची सर्वच सूत्रे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवार यांच्याच हातात राहणार असली तरीही एकूणच उमेदवार निश्चितीमध्ये मुनगंटीवारांचे वर्चस्व राहील असे आज तरी जाणवते आहे. मुनगंटीवारांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विकास कामांसाठी प्रचंड संघर्ष केलेला आहे. त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने वळलेले आहे. त्यातच ते मंत्री असताना त्यांनी चंद्रपुरात दारूबंदी घडवून आणली होती. त्यामुळे महिलावर्ग त्यांच्या बाजूने उभा राहील असे चित्र दिसते आहे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार हे आज सर्वेसर्वा असल्याचे जाणवत असले तरी माजी खासदार नरेश फुगली पुगलिया हे देखील सक्रिय झाले आहेत. प्रसंगी ते वेगळी आघाडी करून निवडणुका लढवतील असेही चित्र आहे. प्रतिभा धानोरकर यांचाही रोल इथे महत्त्वाचा राहील असे बोलले जाते आहे.
अमरावतीत भाजप समोर सत्ता टिकवण्याचे आव्हान तर आहेच, पण त्याचवेळी मित्र पक्षांना सोबत घेऊन चालायचे की स्वबळावर लढायचे यावरच खल चालू असलेला दिसतो आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा मित्र पक्षांना सोबत घेण्यास विरोध आहे. अमरावती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ आहे. त्यामुळे भाजपमध्ये त्यांचाही शब्द अंतिम ठरणार आहे. इथे भाजपच्या उमेदवार मुलाखती देखील आटोपलेल्या असून काँग्रेसची सध्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे. अमरावतीत आमदार रवी राणा आणि माजी आमदार बच्चू कडू यांचा फॅक्टर देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच काही काळ काँग्रेसमध्ये, काही काळ भाजपमध्ये आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये अशी भटकंती करणारे माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांचे महापालिकेत वर्चस्व असल्यामुळे ते देखील कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अकोल्यात जरी भाजपची सत्ता असली तरीही त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे असलेले आव्हान दुर्लक्षित येत नाही. इथे प्रकाश आंबेडकरांचे बऱ्यापैकी वर्चस्व राहिलेले आहे. अर्थात त्याचा जोर ग्रामीण भागात असला तरीही शहरी भागात त्यांचा प्रभाव निश्चित आहे. इथे काँग्रेसची देखील चाचपणी सुरू असल्याचे जाणवते आहे. भाजपमध्ये इथे देखील कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडणूक लढवली जावी हीच इच्छा आहे. मात्र तसे झाले तर मत विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान २० डिसेंबर रोजी नगर परिषदांचे उर्वरित मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहेत. यात मतदारांचा कौल कुणीकडे झुकलेला दिसतो ते बघून या चारही महापालिकांमध्ये मतदार आपली मते निश्चिती करतील असे बोलले जात आहे. एकूणच या चारही नगर परिषदांमध्ये निवडणुका रंगतदार होतील असे बोलले जात आहे. सध्या चारही महानगरपालिकांमध्ये युती किंवा आघाडी कशी होणार यावरच खल सुरू असलेले दिसत आहेत. त्याचबरोबर उमेदवार निवडीसाठी वेगात हालचाली सुरू असलेल्या दिसून येत आहेत. चारही महानगरपालिकांमधील प्रमुख नेते आता कामाला लागलेले दिसत असून पक्षश्रेष्ठ त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचेही जाणवते आहे. एकदा उमेदवार निश्चिती झाली की मग प्रचाराला रंग चढणार आहे.
इथे प्रचारात स्थानिक नेत्यांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रतापराव जाधव, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, संजय राठोड, आशीष जयस्वाल यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, काँग्रेसचे नितीन राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे सर्वच सक्रिय झालेले दिसतील. याशिवाय आणखी कोणकोण स्टार प्रचारक सक्रिय होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
- अविनाश पाठक






