३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचे काम पूर्ण
राहुल देशमुख
कर्जत : कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहेत. या मार्गिकेसाठीचा ३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचं काम पूर्ण झालं असून, यामुळे मार्गिकेसाठीचा मोठा टप्पा पार पडला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. अखेर आता कर्जत-पनवेल मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत - पनवेल या मार्गिकेसाठी डोंगर फोडून एक बोगदा उभारण्यात आला आहे. कित्येक दिवस या मार्गाचं काम सुरू होतं. आता किरवली-वांजळे गावाजवळील ३०० मीटर लांबीचा हा नवा बोगदा आता पूर्ण झाला आहे. या बोगद्यात आता रूळ टाकण्याचं काम बाकी आहे. बोगद्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या मार्गावरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
२००५ मध्ये बांधलेला जुना हलीवली बोगदा ठिसूळ असल्याने दगड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे हा मार्ग रेल्वे, लोकलसाठी सुरक्षित नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल-कर्जत दरम्यान नवीन आणि सुरक्षित मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. यातून चौक ते कर्जत हा पूर्णपणे नवा मार्ग आणि पनवेल ते चौक हा जुना मार्ग वापरून हा प्रकल्प तयार केला जात आहे.
या नव्या मार्गावर कर्जत तालुक्यात किरवली आणि वांजळे गावांच्या हद्दीत एक मोठा बोगदा बांधण्यात आला आहे. हा बोगदा दुहेरी मार्गांसाठी पुरेशी जागा ठेवून बांधला आहे. या बोगद्याचं बांधकाम भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन करण्यात आलं आहे. तशीच त्याची रचना केली आहे. बोगद्याचं एक टोक किरवली गावात, तर दुसरं टोक वांजळे गावात आहे. या बोगद्यानंतर कर्जत-कल्याण राज्यमार्ग लागतो, ज्यावर आधीच उड्डाण पूल तयार आहे.
त्यामुळे या नव्या रेल्वे मार्गामुळे रस्ते वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही. बोगद्याचं बांधकाम पूर्ण झालं असून मार्गिका तयार असल्याने कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग आता उपनगरीय सेवेसाठी सज्ज झाली आहे. बोगद्याची संरचनात्मक कामं पूर्ण झाली असून ही मार्गिका तयार असल्याने कर्जत–पनवेल रेल्वे मार्ग लोकल सेवेसाठी तयार झाला आहे.






