मुंबई : भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी सुरूच ठेवत उपांत्य फेरीत श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर झालेल्या या पावसामुळे प्रभावित सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ गडी गमावून १३८ धावा केल्या. श्रीलंकेच्या डावावर भारतीय गोलंदाजांनी चांगले नियंत्रण ठेवत धावगती रोखली.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने आक्रमक आणि संयमी खेळी करत केवळ १८ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. विहान आणि आरोन यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने १२ चेंडू राखून सामना जिंकत आपली ताकद दाखवून दिली.
या विजयासह भारत अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असून आता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीचा सामना रंगणार आहे. युवा संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






