मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत टॅक्सी हे नवे ॲप १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. सहकारी तत्त्वावर आधारित असलेले हे ॲप प्रवासी आणि चालक दोघांच्याही हिताचा विचार करून विकसित करण्यात आले आहे.
भारत टॅक्सीमुळे सध्या पीक आवर्समध्ये होणाऱ्या अचानक भाडेवाढीपासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ॲपमध्ये भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यात येणार असून प्रवाशांना योग्य आणि परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे.
भारत टॅक्सी ॲप सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेमार्फत चालवले जाणार आहे. या मॉडेलमध्ये चालक स्वतः व्यवस्थेचा भाग असतील. कार सेवेसोबतच ऑटो आणि बाईक टॅक्सी सेवा देखील या ॲपवर उपलब्ध असणार आहे. सुरुवातीला हे ॲप दिल्लीत सुरू करण्यात येणार असून तिथे त्याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आतापर्यंत सुमारे ५६ हजार चालकांनी नोंदणी केली आहे.
या ॲपमुळे चालकांनाही मोठा फायदा होणार आहे. सध्या ओला आणि उबरमध्ये चालकांना भाड्याचा सुमारे ७० टक्के हिस्सा मिळतो. मात्र भारत टॅक्सी ॲपमध्ये चालकांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांवरील अवलंबन कमी होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ॲपमध्ये दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यानं विविध सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. दिल्लीनंतर गुजरातमधील राजकोट येथेही चाचणी सुरू असून १ फेब्रुवारीपासून तिथे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्यानं भारत टॅक्सी ॲप संपूर्ण देशभर सुरू करण्यात येणार आहे.






