पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या निर्णयानुसार १९ डिसेंबरपासून पुण्याशी संबंधित मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था अंमलात येणार आहे.
नव्या पद्धतीनुसार पुणे–अमरावती एक्सप्रेस, पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस या गाड्यांवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी बंधनकारक राहणार आहे.
या बदलानंतर आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ओटीपी देणे आवश्यक असेल. बुकिंगवेळी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.
ओटीपी पडताळणीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल.






