करिअर : सुरेश वांदिले
ओशन इंजिनीअरिंग या शाखेतील अभियंते आणि तज्ज्ञांना जागतिक पातळीवर वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये (१) डिझायनर्स, (२) बांधकाम निरीक्षक, (३) सल्लागार, (४) विपणन आणि विक्री, (५) कार्यान्वयन नियामक, (६) सर्वेक्षण, (७) संशोधन, (८) विकास, (९) शिक्षण-प्रशिक्षण (१०) कोस्टल इंजिनिअर (११) एन्व्हॅायरेन्मेन्टल इंजिनीअर, (१२) नॅव्हल आर्किटेक्ट, यांचा ढोबळरीत्या समावेश करता येतो.
अभ्यासक्रम
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने या विषयातील पुढील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
बी. टेक इन (अ) नॅवल अर्किटेक्चर ॲॅण्ड ओशन इंजिनीअरिंग आणि (ब) नॅव्हल आर्किटेक्चर ॲॅण्ड शिप बिल्डिंग. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षे.
अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.
तीन वर्षे कालावधीचा बी. एस्सी (शिपबिल्डिंग ॲॅण्ड रिपेअर) हा अभ्यासक्रम, कॉलेज ऑफ शिप टेक्नॉलॉजी पल्लकड, येथे करता येतो. ही संस्था या विद्यापीठाशी संलग्नित आहे.
अर्हता - १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.
एम. टेक इन (अ)नॅवल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनिअरिंग आणि (ब) ड्रेजिंग ॲण्ड हार्बर इंजिनिअरिंग. अर्हता-६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरोनॉटिकल/ मरीन/ नॅव्हल आर्किटेक्चर या विषयातील पदवी
एम. टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या सीइटी परीक्षेत बहुपर्यायी वस्तुनिठ पद्धतीचे १२० प्रश्न विचारले जातात.
या अभ्यासक्रमात जहाजांच्या डिझाइनचे अद्ययावत प्रशिक्षण दिलं जातं. त्याशिवाय बंदर उभारणीचं तंत्रकौशल्य शिकवलं जातं. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि बंदरे अभियांत्रिकी यामध्ये कौशल्य प्राप्त करून देणारा हा अभ्यासक्रम आहे.
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना जपान, कोरिआ, भारत व इतर देशांच्या जहाज निर्मिती व बांधणी कंपन्या, नौदल, तटरक्षक दल, डॉकयार्ड, शिपयार्ड, शिप सर्व्हेयर, शिप डिझाइन इन्स्टिट्यूट, आइल रिग कॅन्स्ट्रक्शन सेंटर, नॅव्हल आणि ओशनोग्रॅफी सेंटर आदी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळू शकतात. हे अभियंता जहाज बांधणी, निर्मिती, डिझाइन व इतर तांत्रिक बाबतीत सल्ला वा सहाय्य सेवा देऊ शकतात. सागरी पर्यावरण व सागरी संशोधनाचं कार्य करण्याची संधी मिळू शकते. जे विद्यार्थी नॅव्हल आर्किटेक्चर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करतात त्यांना संपूर्ण सागरतळाच्या / शिपयार्डच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते किंवा जहाज बांधणीचं नियोजन, निर्मिती आणि त्याची प्रत्यक्ष बांधणी अशा मर्यादित स्वरुपाचं काम सोपवलं जाऊ शकतं. या विषयात संशोधन अभ्यासक्रमही करता येतो.
संपर्क- ईस्ट कोस्ट रोड, सेम्मेनचेरी, चेन्नई -६००११९, दूरध्वनी- ०४४-२४५३९०२०, संकेतस्थळ- www.imu.ac.in , ईमेल-acdemicscell@imu.ac.in
जबाबदाऱ्या
किनारा संरक्षणाच्या विविध संसाधनांची निर्मिती, बंदरे आणि जेट्टींचे डिझाइन, बांधणी, देखभाल, दुरुस्ती आदी जबाबदाऱ्या कोस्टल इंजिनीअर्सना पार पाडाव्या लागतात.
तीव्र सागरीय पर्यावरणाला सक्षमरीत्या तोंड देता यावं म्हणून मजबूत सरंक्षक बांधणी, अडथळे, स्थानके यांच्या डिझायनिंगचं काम ऑफशोर इंजिनियर्सना करावं लागतं.
घातक मानवी प्रदूषण वा अशाच इतर बाबींपासून समुद्र आणि किनाऱ्यांचं संरक्षण करण्याचं कार्य मुख्यत्वे एन्व्हॅायरेन्मेन्टल इंजिनियर्सना करावं लागतं. सागरी खनिजं, लाटांव्दारे निर्माण होणारी उर्जा, या घडामोडींमध्ये या अभियंत्यांना योगदान द्यावं लागतं.
सागराचं विस्तृत सर्वेक्षण, त्याचे नकाशे तयार करणं, ही कामे ओशन इंजिनीयर्सना करावी लागतात. सागरावरील वादळे, इतर अडथळे यापासून जहाजे वा इतर साधनसामग्रीचं संरक्षण करण्यासाठी अशा आरेखनांचा उपयोग होतो.






