Wednesday, December 17, 2025

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आता येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र, या निवडणुकीकरता नगरसेवकांच्या प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे, त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे ती महापौर पदाच्या आरक्षणाची. परंतु यंदा चक्राकार पध्दतीने महापौर पदाचे आरक्षण पडण्याची शक्यता कमी असून महापौर पदाचे आरक्षण नव्याने टाकले जाण्याची दाट शक्यता आहे. . त्यामुळे यंदा नगरसेवकांप्रमाणे नव्याने महापौर पदाचे आरक्षण पडले जाणार असल्याने यंदा कोणत्या प्रवर्गाची चिठ्ठी निघते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

मुंबई महापालिकेत मागील १९९८पासून चक्राकार पध्दतीने महापौर पदाचे आरक्षण पडले जात आहे. त्यामुळे मागील दहा महापौरांसाठी पडलेल्या आरक्षणानुसार आता उर्वरीत आरक्षण पडले जाण्याचा अंदाज वर्तवला जातो. परंतु सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण हे आजवर पडलेल्या आरक्षणानुसार चक्राकार पध्दतीने न पाडता यंदा प्रथमच नव्याने काढले गेले. त्यामुळे प्रभाग आरक्षण नव्याने निघाले गेले आहे. त्याच नुसार यंदा महापौर पदाचे आरक्षणही नव्याने काढले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार महापौर पदाचे आरक्षण लॉटरी सोडत लवकरच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढली जाईल. पण ती कशाप्रकारे असेल हे सांगता येणार नाही.

जर पूर्वीच्या आरक्षणाचा विचार केला गेला तरी यापूर्वी जी आरक्षण निघाली आहे, ती वगळून इतर आरक्षणानुसार महापौर पदाचे आरक्षण निघेल. परंतु प्रभाग आरक्षण नव्याने काढले गेल्याने महापौर पदाचेही आरक्षण चक्राकार पध्दतीने न काढता नव्याने काढले जाईल आणि पुढील निवडणुुकीपासून ते चक्राकार पध्दतीनुसार असेल.

तीन वर्षांनंतर महापौर मुख्यालयात करणार प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून महापालिकेत महापौर नसून या पदाचा भार प्रशासकांच्या हाती गेला आहे. त्यामुळे सन १५ ऑगस्ट २०२२ पासून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी महापौर म्हणून प्रशासक तथा आयुक्त हे ध्वजारोहण करत आहेत. परंतु यंदा १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक निकाल जाहिर होणार असल्याने येत्या २० जानेवारीपर्यंत महापौरांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास २६ जानेवारीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी महापालिका मुख्यालयातील ध्वजा रोहणाचा मान महापौरांकडे पुन्हा येणार आहे.

आतापर्यंत कसे होते महापौर पदाचे आरक्षण

सन १९९८ : ओबीसी

सन १९९९ : सर्वसाधारण

सन२००२ : एस सी

सन २००४ : सर्वसाधारण

सन २००७ : ओबीसी महिला

सन २००९ : सर्वसाधारण महिला

सन २०१२ : सर्वसाधारण

सन २०१४ : एस सी महिला

सन २०१७ : सर्वसाधारण

Comments
Add Comment