गणेश पाटील
विरार : वसई - विरारमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असले तरी या ठिकाणी मुख्य आणि थेट लढती भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्येच होणार असल्याचे संकेत आहेत.
यापूर्वी पालिकेच्या सभागृहात असलेला १०८ नगरसेवकांचा आकडा कायम ठेवणे बहुजन विकास आघाडीसाठी कठीण बाब आहे, तर केवळ खाते उघडलेल्या भाजपला सुद्धा एका नगरसेवकावरून बहुमतापर्यंत सदस्य संख्या नेणे सोपे नाही. दोन्ही राजकीय पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी, ही निवडणूक भाजपसाठी बेरजेची आणि बहुजन विकास आघाडीसाठी नगरसेवकांचा आकडा वजा करणारी ठरणार आहे.
वसई - विरार महानगरपालिकेवर सलग दोन टर्म बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ११५ पैकी तब्बल १०८ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे निवडून आले होते. तर एका नगरसेवकाच्या माध्यमातून भाजपला केवळ खाते उघडता आले होते. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सत्तापरिवर्तन होत भाजपसह महायुतीची सत्ता जिल्ह्यात आल्यामुळे एकूणच राजकीय चित्र बदलले आहे.
वसई, नालासोपारा आणि बोईसर हे बहुजन विकास आघाडीचे विधानसभेचे तीनही गड त्यांच्या हातून गेले आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीतून काही माजी नगरसेवक, नेते आणि कार्यकर्ते यांनी याआधीच भाजपचा रस्ता गाठला आहे. महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. तर बहुजन विकास आघाडी आणि उबाठा गटातर्फे युतीच्या चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते पालिका निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याचे सांगत आहेत. मात्र काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून ही निवडणूक लढण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करीत आहेत.
एकंदरीत आगामी निवडणुकीत सत्ता गाजविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असले तरी वसई-विरारच्या निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट आणि चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत. या लढतीमध्येच भाजपच्या बेरजेचे आणि बहुजन विकास आघाडीच्या वजाबाकीचे 'गणित' दडलेले आहे.






