सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने विमानतळावर तिसरी समांतर धावपट्टी उभारण्याच्या दृष्टीने सविस्तर तांत्रिक व व्यावसायिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पात्र व नामांकित एकल संस्था अथवा संयुक्त भागीदार संस्थांकडून निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सिडको प्रशासनाकडून या माध्यमातून भविष्यातील प्रवासी व माल वाहतुकीचा अंदाज, पायाभूत सुविधांची गरज, आर्थिक व्यवहार्यता, पर्यावरणीय बाबी तसेच दीर्घकालीन विमान वाहतूक मागणी लक्षात घेऊन तिसऱ्या धावपट्टीची आवश्यकता आणि उपयुक्तता तपासली जाणार आहे. दरम्यान, २०३७ नंतरच्या दीर्घकालीन विमान वाहतूक मागणीचा विचार करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारण्याचा पर्याय सध्या तपासण्यात येत आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रफळावर विकसित होत असलेला हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन माल वाहतूक हाताळण्यासाठीच्या क्षमतेचा आहे.
या विमानतळाची रचना दोन समांतर व स्वतंत्र धावपट्ट्यांसह करण्यात आली असून, चार परस्पर जोडलेल्या प्रवासी टर्मिनल्सचा यामध्ये समावेश आहे. त्यातच नवी मुंबई विमानतळाचा विकास पाच टप्प्यांत केला जात असून, पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.
या विमानतळाहून देशांतर्गत विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसऱ्या धावपट्टीचा अभ्यास हा राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, मुंबई महानगर प्रदेशाच्या वाढत्या आर्थिक व औद्योगिक गरजांना चालना देणारा ठरणार आहे.
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने सिडकोने घेतलेला हा निर्णय सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा नियोजनाची साक्ष देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा परिसराच्या दीर्घकालीन विकासाच्या गरजांनुसार सातत्याने विकसित होत राहील, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको






