Wednesday, December 17, 2025

नागपूर-गोवा शक्तिपीठ होणारच

नागपूर-गोवा शक्तिपीठ होणारच

सुधारित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

मुंबई : नागपूर ते गोवा प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाला सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार अखेर एमएसआरडीसीने शक्तिपीठच्या संरेखनात मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत.

८०३ किमीच्या महामार्गातील अंदाजे २८० किमीच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. सुधारित संरेखनानुसार आता ८०३ किमीचा महामार्ग थेट ८४० किमीचा झाला आहे. राज्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार असून सुधारित संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आठवड्याभरात राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

एमएसआरडीसीने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ८०३ किमीचा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणार होता. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधूदुर्ग असे हे जिल्हे आहेत.

या जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळापर्यंत पोहोचणे या महामार्गामुळे सोपे होणार आहे. त्यामुळे या मार्गाला शक्तिपीठ महामार्ग नाव देण्यात आले आहे. या महामार्गाच्या कामाअंतर्गत संयुक्त मोजणीचे काम सध्या सुरू आहे. तर ६० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. पण आता मात्र महामार्गातील संरेखनात मोठा बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने संरेखनात बदल केला आहे.

सुधारित संरेखनानुसार चंदगड, आजरा परिसरात अंदाजे १० किमीने महामार्गाची लांबी वाढली आहे, तर साताऱ्यासह इतर भागांचा समावेश केल्याने महामार्गाची लांबी अंदाजे २५ किमीने वाढली आहे. त्यामुळे ८०३ किमीचा महामार्ग आता अंदाजे ८४० किमीचा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान नवीन संरेखनाचे काम पूर्ण झाले आहे. तेव्हा आठवड्याभरात नवीन महामार्गाच्या संरेखनाचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यातल्या काही भागांतून महामार्ग जाणार

एमएसआरडीसीतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८०३ किमीतील अंदाजे २८० किमीच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. सोलापूरपासून पुढीलच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. तर आता या महामार्गात सातारा जिल्हा समाविष्ट करण्यात आला असून साताऱ्यातली काही भागातून महामार्ग जाणार आहे. तसेच चंदगड, आजरा येथून महामार्ग नेण्यात येणार असून आधी सांगली, कोल्हापूरमधील ज्या भागातून महामार्ग जाणार होता तिथून हा महामार्ग आता जाणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >