Wednesday, December 17, 2025

अर्धा प्याला रिकामा, की भरलेला

अर्धा प्याला रिकामा, की भरलेला

माेरपीस : पूजा काळे

नाण्याच्या दोन बाजू समजून घेतल्या, तर दोन्ही तेवढ्याच महत्त्वाच्या वाटतात. तसंच काहीसं या पेल्याबद्दल बोलता येईल. मानसशास्त्रीय अभ्यास करताना अर्ध्या पेल्याचं उदाहरण दिल जातं. प्रथम दृष्टीला किंवा तुमच्या नजरेला काय दिसतं हे महत्त्वाचं असतं; परंतु दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याने एखाद्या गोष्टीमागची कारणमीमांसा शास्त्रीयदृष्ट्या पटण्याजोगी असावी. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असल्याने प्रत्येकाचा दृष्टिकोन इथं वेगळा असू शकतो. त्यांच्या प्रतिक्रिया सरळ, विचित्र, बिनविचारी असू शकतात. मुळात तुमची विचारधारा इथं महत्त्वाची असल्याने धारेला धार आणत दिलं गेलेलं स्पष्टीकरण हे शंभर टक्के न्याय देणारं असावं, त्यात कुठेही उथळपणा किंवा बोथटपणा नसावा. जे जे वाटतं ते ते थेट बोलण्यापूर्वी समृद्ध विचारांची जुळणी करत उजळणी केलेली केव्हाही उत्तम म्हणावी लागेल. एक उदाहरण देताना मला नेहमी जाणवलेली एक गोष्ट इथं नमूद कराविशी वाटते. आजकाल कुठल्याही विषयावर थेट निशाणा साधणारे नेटकरी एखाद्या घटने वा अनुभवाचे तीनतेरा वाजवतात. जगात असलेली सगळी अक्कलहुशारी यांच्याकडे असल्यासारखी अक्कल पाजळतात. कुणाच्या खासगी गोष्टीत नको एवढे नाक खुपसून त्यांच जगणं सळो की पळो करतात. एखाद्या घटनेशी संबंधित ऊहापोह करून समोरच्याला जेरीस आणतात. याचा अर्थ समजायला आणि समजवायला गेलं, तर आगपाखड करून समजवणाऱ्याची बुद्धी काढतात. समाजभान नावाची गोष्ट आपण विसरत चालले आहोत. उचलली जीभ लावली टाळ्याला असं करणं म्हणजे बुद्धी गहाण टाकल्यासारखं होय. ज्याची सुरुवात आणि शेवट एका पातळीवर येऊन संपतो. वैचारिक पातळीचा अभाव, अज्ञानाचा राक्षस, संकुचित दूरदृष्टी यामुळे नेटकरी थेट निशाणा साधतात. सद्यस्थितीत माणसं एकमेकांना समजून न घेता नकारात्मक विचारांचं मोहोळ उडवताना दिसतात जे फार वाईट आणि समाजघातक आहे. आता पेल्याबद्दल विचार करू.

अर्धा प्याला रिकामा की भरलेला यावर महत्त्वाचं विधान करण्यापूर्वी स्वत:च्या सदसदविवेकबुद्धीला जोर देऊन विचार करावा. अर्धा प्याला रिकामा की भरलेला यावर भाष्य करायचं झालं तर, सुखदुःखरूपी आयुष्याच्या पायवाटेत अनुभवायला आलेले प्रसंग, त्यातून तुम्हाला प्राप्त झालेले अगाध ज्ञान आणि त्या ज्ञानाचा तुमच्यावर झालेला योग्य तो परिणाम पाहता या पेल्याचं विवेचन करता येईल. पेला रिकामा की भरलेला यापेक्षा त्यातून प्रतीत होणारा समाज आणि त्यावर आधारित समाजमन प्रत्ययाला येईल. ग्लासाच्या प्रतिमेत माणसाचं प्रतिबिंब, त्याच्या सवयी, लकबी, आचार- विचार यांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात.

सकारात्मक विचारांच्या आवर्तनात असे दिसून येईल की, ग्लास केवळ पाण्यानेचं नाही, तर हवेनेही भरलेला आहे. थोडक्यात त्याला पूर्ण भरलेला म्हणता येईल. पण ज्यांच्यापाशी नकारात्मकता आहे त्यांना तो अर्धा पाण्याने भरलेला दिसेल. मला विचाराल तर, "तो जे आहे ते" म्हणजे तटस्थ न्युट्रल म्हणजे सर्वसमावेशक असेल. फार फार तर यात तहान महत्त्वाची आहे. कारण जे पाणी मला उपलब्ध झालंय. ते माझ्यासाठी त्यावेळी खूप महत्त्वाचं आहे. माझ्या तहानेची गरज अर्ध्या ग्लासाने भागत असेल, तर मला हा प्रश्न पडणार नाही. कारण मी माझी गरज समजून घेतलेली असेन. दुसरं माझा स्वभाव जो छोट्या-छोट्या गोष्टींत सुख-समाधान मिळवण्याचं कौशल्य माझ्यात राखतो आणि तिसरं म्हणजे समाजभान. समाजात वावरताना जाणीवपूर्वक नीतीमूल्यांची गाठ बांधून घेतली की, मनाला वेसण घालण्याचं काम आपसूक होतं.

संत तुकाराम महाराज म्हणतात, बळ बुद्धी वेचुनिया शक्ती। उदक चालवावे युक्ती।... पाण्याचा वापर युक्तीने करा. हा मंत्र कोणत्याही काळाला लागू पडेल असा आहे. थोडक्यात जगण्याचा आनंद घेताना जगा आणि जगू द्या हा मंत्र आजमावता आला पाहिजे. सोशल मीडियाच्या काळात अनेक मतंमतांतर असू शकतात. यात आपली काय भूमिका असावी हा वस्तुपाठ आहे. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान। या संत वचनात थोडासा बदल करून मी असे म्हणेन की, "ठेविले अनंते ऊत्कर्ष साधावे, चित्ती असू द्यावे समाधान।" परिस्थितीशी सामना करताना, आनंदाचं परिमाण शोधताना, घडलेले कष्ट माझ्या ठायी एवढे रुजलेत की, अर्धा पाण्याचा ग्लास समाधानानं अमृत म्हणून ओठी लावेन. यात अंतिम सत्य एकच असेल, त्यागापेक्षा तृप्तीतली विरक्ती महत्त्वाची.

Comments
Add Comment