कौटुंबिक आघात किंवा फॅमिली ट्रॉमा म्हणजे असा भावनिक आणि मानसिक त्रास, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतो किंवा कुटुंबातील एखाद्या अत्यंत तणावपूर्ण घटनेमुळे निर्माण होतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना दीर्घकाळ प्रभावित करतो. हा आघात एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण कुटुंबाच्या कार्यप्रणालीवर आणि सदस्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम करतो. कौटुंबिक आघात म्हणजे काय, त्याचे स्वरूप, कारणे, लक्षणे आणि उपाययोजना याबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
कौटुंबिक आघात म्हणजे वर्षानुवर्षे जमा झालेला आणि वारंवार अनुभवलेला मानसिक आणि भावनिक त्रास होय. कौटुंबिक आघात हा प्रकार आपण दोन मुख्य प्रकारांमध्ये समजावून घेऊ शकतो. आंतर-पिढीगत हा आघात एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे नकळतपणे हस्तांतरित होतो. उदाहरणार्थ, जर पालकांनी बालपणात मोठा आघात म्हणजे युद्ध, दुष्काळ, गंभीर भेदभाव अनुभवला असेल, तर त्याचे भावनिक आणि वर्तणुकीचे परिणाम ते नकळतपणे त्यांच्या मुलांच्या संगोपनात आणतात. तीव्र कौटुंबिक आघात म्हणजे कुटुंबातील एखाद्या मोठ्या आणि अचानक आलेल्या संकटातून निर्माण होणारा आघात. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू, कुटुंबातील कोणाचेही ऐकापेक्षा अधिक लग्न झालेली असणे, घरातील कोणीही गुपचूप कोणाला न कळवता अथवा पळून जावून लग्न केलेले असणे, एकमेकांमध्ये सावत्र अथवा भेदभाव असणारे नातेसंबंध तसेच पती-पत्नीमध्ये अत्यंत तणावाचे वैवाहिक संबंध असणे, कुटुंबात कोणतीही अविवाहित व्यक्ती असणे, तरुण वयात वैधव्य आलेले महिला पुरुष असणे, अचानक पती-पत्नी विभक्त झालेले असणे, घरातील कोणाचेही विवाहबाह्य संबंध विकोपाला गेलेले असणे, कोणाची आत्महत्या अथवा गंभीर अपघात, अचानक आलेले अपंगत्व, नैसर्गिक आपत्ती, दीर्घ कालीन गंभीर आजार, तुरुंगवास, घातपात, बलात्कार, अपहरण, खून, दिवाळखोरी, घटस्फोट यांसारख्या घटना कौटुंबिक आघाताला कारणीभूत ठरतात. व्यसन आणि मानसिक आजार जसे की कुटुंबातील एखाद्या सदस्याला दारूचे/अमली पदार्थांचे व्यसन असणे किंवा गंभीर मानसिक आजार असणे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती मध्ये गैरवर्तन, पिळवणूक, हिंसाचार लहानपणी घरातील कोणासोबत झालेले असणे, बालपणात झालेले भावनिक, मानसिक अगदी शारीरिक दुर्लक्ष म्हणजेच आजारपणात योग्य सोयी-सुविधा, देखभाल मिळालेली नसणे सुद्धा खूप मोठा भाग आहे, ज्याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. अनेकदा गंभीर नुकसान जसे की कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले असणे, चोरी, दरोडा यांसारख्या घटना, मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणा, अपरिहार्य परिस्थितीमुळे कुटुंबातील लोकांचे स्थलांतर होणे यामुळे मानसिकतेवर खूप परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. संपूर्ण कुटुंबाने राहण्याचे ठिकाण बदलल्यामुळे सहन करावे लागलेले सांस्कृतिक धक्के किंवा संघर्ष आयुष्यात मोठी पोकळी निर्माण करतात. त्याचप्रमाणे वारंवार घरातील लोकांचे एकमेकांशी होणारे संघर्ष, कुटुंबातील सदस्यांमध्ये कायमस्वरूपी आणि न सुटणारे तीव्र वाद अशी परिस्थिती असल्यास पूर्ण कुटुंब सतत तणावात असते. अनेकदा मोठ्या कुटुंबात एकमेकांपासून खूप महत्त्वाचे निर्णय लपवून ठेवले जातात त्यामुळे जेव्हा ते सत्य समोर येते तेव्हा नात्यात दरी निर्माण होते.
कौटुंबिक आघाताची लक्षणे काय आहेत यासंबंधी जाणून घेणे पण आवश्यक आहे. कौटुंबिक आघात व्यक्ती आणि संपूर्ण कुटुंबाच्या स्तरावर अनेक प्रकारे दिसून येतो. यातून गेलेल्या व्यक्तींमध्ये दिसणारी लक्षणे अभ्यासल्यास लक्षात येते की, भावनिक अस्थिरता जसे की तीव्र चिंता, भीती, नैराश्य आणि सतत अपराधीपणाची भावना अशा कुटुंबातील लोकांमध्ये असते. स्वतःचे नातेवाईक अथवा सामाजिक संबंध, इतर नातेसंबंध हाताळताना या लोकांना खूप अडचणी येतात. इतरांवर विश्वास ठेवण्यात अडचण, भावनिक संबंध जोडण्यास भीती वाटणे, अति-आसक्ती दाखवणे, पटकन अति आंधळा विश्वास ठेवणे असे प्रकार या कुटुंबातील लोकांना सतावतात. खूपदा हे लोकं व्यसनाधीनता, स्वतःला इजा पोहोचवणे किंवा धोकादायक वर्तन करणे, आत्महत्यांचे प्रयत्न अशा गोष्टी करतात. या लोकांच्या शारीरिक तक्रारीबद्दल बोलायचे झाल्यास कोणतेही वैद्यकीय कारण नसताना सतत डोकेदुखी, पोटदुखी किंवा तीव्र थकवा या लोकांमध्ये पाहायला मिळतो. खूप मोठ्या प्रमाणात विसंवाद जसे की भावनिकरीत्या बधिर होणे, संदर्भहीन बोलणे, भूतकाळातील घटनांपासून स्वतःला वेगळे ठेवणे यावर ही लोकं ठाम राहतात. कुटुंबामध्ये दिसणारी लक्षणे जर पाहिली तर एकमेकांमधील संवादाचा अभाव अशा ठिकाणी कायम असतो. गुप्तता आणि रहस्ये यांनी भरलेले आयुष्य अशी कुटुंब जगतात. यांसारख्या कुटुंबात भूतकाळात घडलेल्या अनेक अनाकलनीय घटना, गूढ गुपित माहिती असल्याचे कळते. त्या व्यक्तीला जेव्हा सत्य परिस्थिती समजते तेव्हा ती पूर्णपणे कोलमडून जाते. सतत कठोर भूमिका घेत राहणे म्हणजेच कुटुंबातील सदस्य अनावश्यकपणे कठोर नियम पाळतात किंवा प्रत्येकाने ठरलेल्या 'भूमिकेत' राहणे अपेक्षित असते. अखंड संघर्ष करत राहणे या लोकांच्या अंगवळणी पडते. आपण लढवय्ये आहोत, आपली कोणाशी तरी सतत लढाई सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे अशी या लोकांची मानसिकता असते. काही कारणे नसतानाही कुटुंबात सतत तणाव आणि भांडणे होत राहणे, गैरसमज असणे, अबोला असणे याचेच लक्षण आहे. कुटुंबातील सदस्यांना भावनिक संकटाच्या वेळी एकमेकांकडून योग्य आधार अथवा मार्गदर्शन मिळत नाही. जो तो त्याचं पाहून घेईल आपण मधे पडायचं नाही या विचारसरणीचे लोक अशा कुटुंबात तयार होतात. अशी कुटुंब सतत एकमेकांना दोषी ठरवणे, आरोप-प्रत्यारोप करत राहणे, खरं खोटं, चूक बरोबर ठरवणे या चक्रात अडकून पडतात.
कौटुंबिक आघातावरील उपाययोजना आपल्याला माहिती असणे क्रमप्राप्त आहे. कौटुंबिक आघात बरा करणे ही एक दीर्घ जास्त काळ चालणारी प्रक्रिया आहे; परंतु योग्य उपाययोजनांनी सकारात्मक बदल घडवून आणता येतो. व्यावसायिक मदत घेणे हा पहिला टप्पा यातून बाहेर पडायला मदत करू शकतो. टप्प्याटप्प्याने समुपदेशन घेणे, मानस शास्त्रातील तज्ज्ञ सुद्धा यावर उपाययोजना करू शकतात. कौटुंबिक चिकित्सा कोणत्याही आघातावर मात करण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. यात थेरपिस्ट संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणून सुरक्षित वातावरणात संवाद साधण्यास मदत करतात. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना दोष न देता, आघातामुळे होणारे दुःख आणि भावना सुरक्षितपणे व्यक्त करायला शिकणे, स्वतःचा त्रास योग्य पद्धतीने बोलून दाखवणे, सीमा निश्चित करणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा आणि मर्यादांचा आदर करणे, प्रत्येकाला पुरेसं स्वातंत्र्य देणे, आपसात आदरभाव असणे अशावेळी अपेक्षित असते. आत्म-काळजी आणि आधार तसेच भावनिक नियमन म्हणजे माइंडफुलनेस आणि योगासारख्या तंत्रांनी तीव्र भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकल्यास अशा किचकट परिस्थितीमधून मार्ग निघू शकतो. याबरोबरच स्वतःची काळजी घेणे, पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करणे, ध्यानधारणा करणे, आध्यात्मिक कल वाढवणे, सकारात्मक विचार करणे पण गरजेचे असते. पिढीजात आघात मोडणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जागरूकता म्हणजेच आधीच्या पिढीतील आघात आणि त्याचे तुमच्या वर्तणुकीवर होणारे परिणाम ओळखणे, नवे आदर्श निर्माण करणे त्यासाठी जुन्या आणि नकारात्मक कौटुंबिक पद्धतींना ओळखून त्याऐवजी अधिक आरोग्यदायी आणि सकारात्मक वागणुकीचे नवीन आदर्श कुटुंबात स्थापित करणे खूप उपयोगी ठरते. शक्यतो नवीन पिढीच्या हातात कुटुंबातील सूत्र देणे, नवीन पिढीला पुरेसे निर्णय स्वातंत्र्य देऊन, त्यांना विश्वासात घेऊन, समाजातील चांगली उदाहरणे घेऊन त्यानुसार नवीन पिढी आपल्या कुटुंबाला अशा आघातातून बाहेर काढू शकते. बुरसटलेले जुनाट विचार, तोच तोचपणा, चुकीच्या समजुती, वाईट सवयी, चालीरीती खोडून नवीन उमेद आणि ऊर्जा घराला देण्यासाठी नवीन पिढीने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. कौटुंबिक आघात ओळखणे आणि त्यावर काम करणे हे कुटुंबासाठी एक मोठे आव्हान असले तरी, यामुळे कुटुंबातील संबंध अधिक मजबूत होतात आणि भविष्यातील पिढ्यांना या वेदनेतून मुक्त करण्याचा मार्ग मिळतो.
- मीनाक्षी जगदाळे





