‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचे बुद्धिचातुर्य हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झाले आहे.
महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली. आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्ताचा एक थेंब ही न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला आपल्यासमोर येणार आहे.
महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघलसत्तेचा पोलादी पहारा भेदून महाराजांनी घेतलेली मोठी जोखीम, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग याची रोमांचकारी झलक या टिझर मधून दिसून येत आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा,आलोक शर्मा (मुगाफी)आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही, त्यांच्या शौर्याची, धैर्याची आठवण करून देत इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा प्रेरणादायी अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात आणण्याचा आनंद दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.






