Sunday, December 14, 2025

स्त्रीधन

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर

समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत आहे. काही घटस्फोट समंजसपणे होतात, तर काही घटस्फोटामध्ये महिला आपल्या पतीकडे भरघोस रकमेची मागणी करते. त्यात मुलांच्या देखभालीचा खर्चही समाविष्ट केलेला असतो. यामध्ये स्त्रीधन हे महत्त्वाचं मानलं जातं. स्त्रीधन म्हणजे नेमकं काय. अजून समाजामध्ये याबद्दल प्रश्नचिन्हच आहे. काही लोक फक्त लग्नातील मंगळसूत्र म्हणजे स्त्रीधन असा समज करून घेतलेले दिसतात.

भारतीय कायद्यानुसार स्त्रीधन म्हणजे स्त्रीला लग्नात मिळालेल्या भेटवस्तू, मालमत्ता अगोदर, दरम्यान आणि नंतरची याचा त्यात समावेश होतो. त्याचप्रमाणे हिंदू उत्तराधिकारी कायदा १९५६ नियंत्रित केलेला असून कलम १४ नुसार स्त्रीधनाची व्याख्या केली जाते. लग्नाच्या अगोदर मिळालेली मालमत्ता, लग्नात व लग्नानंतर मिळालेली मालमत्ता यावर फक्त स्त्रीचा अधिकार असतो बाकी कोणाचाही नाही, त्या सर्व गोष्टीला स्त्रीधन असं म्हटलं जातं. आजकालची लग्नं ही प्रतिष्ठा पणाला लावणारी झालेली आहेत. त्यामध्ये संस्कार लोप पावत चाललेला आहे. जो लग्नात जास्त खर्च करेल तो सर्वात श्रीमंत अशी बघणाऱ्यांची भावना झालेली आहे.

तन्मयचं साक्षीसोबत लग्न जुळवण्यात आलं. तन्मय हा राजाभाऊ यांचा लास्टनंबर मुलगा. म्हणून शेवटचं लग्न व्यवस्थित करूया या उद्देशाने राजाभाऊ यांनी मोठा सुनांना ज्या पद्धतीने दागिने घातले होते तसंच छोट्या सुनेला म्हणजे साक्षीला दागिने करायचे ठरवलं. तन्मय हा परदेशात कामाला होता त्याच्यामुळे लग्न ठरल्यानंतर आपल्या दोन सुनांच्या गळ्यात जेवढ्या वजनाचे मंगळसूत्र आहे त्याचप्रमाणे साक्षीला करण्याचे त्यांनी ठरवले आणि म्हणून त्यांनी सहा तोळ्यांचे मंगळसूत्र साक्षीसाठी बनवले, त्याचप्रमाणे दोन मोठ्या सुनांना लग्नानंतर त्यांनी हार दिलेला होता तसाच आता लग्नामध्ये साक्षीला घालूया असे राजाभाऊने ठरवले. नंतर मला बनवता येईल की नाही, मी आता किती दिवस राहणार आहे, हा विचार त्यांनी केला म्हणून त्यांनी आपल्या पत्नीचा हार मोडून साक्षीसाठी नवीन हार बनवला आणि सोबत कानातले व मुहूर्तमणी बनवताना त्याने तो छोट्या मंगळसूत्रासारखाच केला व एक अंगठी म्हणजे लग्नामध्ये सुनेला दहा तोळ्यांचे दागिने बनवले आणि साक्षीच्या आई-वडिलांकडून फक्त तन्मयला एक तोळ्याची चैन आणि दोन ग्रॅमची अंगठीच देण्यात आली होती. लग्न व्यवस्थित पार पडले. दोन महिने झाल्यानंतर तन्मय नोकरीनिमित्त परदेशी निघून गेला आणि त्याचवेळी साक्षी त्या घरात न राहता म्हणजेच तन्मय हा व्यवस्थित नोकरी करत असल्यामुळे त्यांनी स्वतःच घर घेतलेलं होतं, त्या घरात लग्न झाल्यानंतर साक्षी आणि तन्मय राहायला आले होते. त्या घरामध्ये अगोदरच तन्मयची चुलत बहीण राहत होती. तन्मय बाहेर गेल्यानंतर ती तिथे घर सांभाळत होती. आता लग्नानंतरही काही दिवस ती तिथेच राहणार होती. कारण तिचा मुलगा तिच्यासोबत राहत होता आणि तो शाळेत जात होता. त्याचं शाळेचं वर्ष संपलं की, ती शाळा बदलून दोघेजण दुसरीकडे राहायला जाणार होते; परंतु तन्मय दोन महिन्यांत बाहेर गेल्यानंतर लगेचच साक्षीने छोट्या कारणावरून भांडण करून ती आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेली होती. कारण राजाभाऊ यांना तीन मुलगे होते. तिन्ही मुलगे वेगवेगळे राहत होते. तसा तन्मयने रूम अगोदरच घेतलेला होता आणि तो तिथे राहत होता आणि त्याच्यासोबत चुलत बहीण राहत होती. राजाभाऊ हे अधून मधून येत होते कारण ते मोठ्या सुनेकडे राहत होते. दोन महिन्यांनंतर साक्षी माहेरी गेल्यानंतर तिला आपल्या नवऱ्याशिवाय करमत नसेल असं सासरच्या लोकांना वाटलं. तन्मय आल्यानंतर ती परत येईल असा त्यांचा समाज झाला. तन्मय नऊ महिन्यांनंतर परत भारतात आला आणि त्याने आपली पत्नी साक्षीला संपर्क साधला की मी आलो आहे. तो घरी आल्यानंतर तिने मी याच्यापुढे घरी येणार नाही, मला घटस्फोट पाहिजे असं सांगितलं. सासरच्या मंडळींना हा मोठा धक्काच बसला म्हणून सर्वांनी घरगुती बैठक घेतली, पण साक्षी नांदायला तयारच नव्हती. तिच्या वडिलांनी सांगितलं की, एका पेपरवर दोघांनी सह्या करा आणि वेगळे व्हा, तर तन्मय या गोष्टीला तयार नव्हता. म्हणून साक्षीच्या वडिलांनी चौकशी केली. तन्मयचे सासरचे आम्हाला स्त्रीधन द्या आणि घटस्फोट द्या असं सांगायला लागले. तन्मयच्या घरातील लोकांना स्त्रीधन म्हणजे नेमके कोणते दागिने हेच माहीत नव्हते. ते बोलले की, आम्ही मंगळसूत्र द्यायला तयार आहोत पण साक्षीचे घरातील लोक सर्वच दागिने मागायला लागले. त्यामुळे या लोकांना धक्का बसला. कारण दहा तोळे दागिने तिला घातलेले होते, आजच्या घडीला त्या दागिन्यांची किंमत पंधरा लाखांच्या आसपास जात होती आणि ही साक्षी लग्न करून फक्त दोन महिने राहिली होती आणि स्त्रीधन पूर्ण मागत होती. त्यामुळे तन्मयच्या कुटुंबाने वकिलांशी संपर्क साधल्यावर त्यांना सर्व समजलं की, स्त्रीधन म्हणजे तिला लग्नात घातलेले दागिने असतात आणि ते द्यावे लागतात. त्यावेळी ते लोक बोलले की, आम्हाला जर असं माहीत असतं तर आम्ही एवढ्या तोळ्याचे मंगळसूत्र घातलं नसतं आणि राजाभाऊ पश्चाताप करू लागले. कारण त्यांनी आपल्या बायकोचा हार मोडून साक्षीला हार बनवला होता, कारण त्यांनी आपल्या दोन मोठ्या सुनानांही हार घातला होता पण तो हार त्याने लग्नानंतर काही वर्षांनी घातलेला होता व त्यांची मंगळसूत्रही जास्त वजनाची नंतरच बनवली गेली होती, पण आता राजाभाऊ म्हणायला लागले की, छोट्या मुलाच्या पत्नीलाही मी आताच दागिने करतो कारण माझ्या आयुष्याचा भरोसा नाही. राहून गेलं तर तसंच राहील म्हणून त्यांनी लग्नामध्ये साक्षीला आपल्या पत्नीचा हार मोडून नवीन हार बनवला आणि बाकीच्या सुनांना जे नंतर मंगळसूत्र सहा तोळ्यांचे बनवलेले होते, त्याच तोळ्यांचे त्यांनी आता साक्षीला बनवलेलं होतं. अती हौशी सासऱ्यांनी छोटं मुहूर्त म्हणीचंही मंगळसूत्र बनवलं होतं. साक्षीच्या आई-वडिलांनी लग्नामध्ये साक्षीला कोणताच दागिना घातला नव्हता, पण सासरच्यांनी तिला दहा तोळे दागिने घातले होते. साक्षीच्या आई-वडिलांनी तन्मयलाच फक्त एक तोळा चैन आणि दोन ग्रॅमची अंगठी घातली होती. लग्नामध्ये जास्त खर्च हा तन्मयचाच झालेला होता. पण दोन महिने फक्त राहून आज साक्षी दहा तोळे स्त्रीधन मागत होती. राजाभाऊ काकुळतीला येऊन, हार घेऊ नकोस हार माझ्या बायकोची आठवण आहे. तिचंही स्त्रीधन होतं असं ते सांगत होते, तर साक्षीच्या वकिलाने सांगितलं की, आम्ही मुलाची अंगठी आणि चैन मागत नाही आहोत पण मुलाला दिलेल्या अंगठी आणि चैन फक्त १२ ग्रामची होती.

दहा तोळे सोने साक्षी घेत होती आणि बारा ग्रॅम फक्त ती सोडत होती, तर तिचे वडील म्हणत होते की ती बारा ग्रामची चैन आणि अंगठी तन्मयला घातलेली होती. ती पण आम्हाला पाहिजे असा वाद त्यांचा चालू होता. सासरच्या मंडळींना असं वाटू लागलं होतं की, साक्षीने दागिन्यांसाठीच लग्न केलं की काय? कारण दोन महिनेच ती राहिली आणि तिलाच घटस्फोट हवा आहे आणि वरती एवढे दागिने ती मागत आहे आणि जर दिले नाही तर आम्ही पोलीस तक्रार करून तन्मयचा पासपोर्ट जप्त करू अशीही साक्षीचे वडील धमकी देऊ लागले होते. राजाभाऊ आणि त्यांच्या दोन सुना वकीलांना बोलू लागल्या की, आम्हाला जर माहीत असतं की मुलगी राहणार नाही, तर आम्ही या मुलीशी लग्न केलं नसतं. दुसरं म्हणजे स्त्रीधन घटस्फोटानंतर सर्वच्या सर्व दिले जाते या गोष्टीची आम्हाला कल्पनाही नव्हती. कारण आमच्या घरात असं कधी झालं नव्हतं. असं माहीत असतं, तर आम्ही लग्नातील दोन तोळ्यांच्या वरती मंगळसूत्र घातलं नसतं कारण आमची गावी लग्नं झाली वीस वर्षांपूर्वी. त्यावेळी आम्हाला सासऱ्याने दोन तोळ्यांचे मंगळसूत्र घातले. आता आमच्या गळ्यात मोठे मंगळसूत्र आहे म्हणून तर आम्ही या मुलीसाठीही तसंच बनवलं. दुसरं म्हणजे स्त्रीधन घटस्फोटानंतर सर्वच्या सर्व दिलं जातं. या गोष्टीची आम्हाला कल्पनाही नव्हती. कारण आमच्या घरात असं कधी झालं नव्हतं. असं माहीत असतं तर आम्ही लग्नात तिला दोन तोळ्यांच्या वरती मंगळसूत्र घातलं नसतं. आता आमच्या गळ्यात मोठे मंगळसूत्र आहे म्हणून सासऱ्याने विचार केला की, हिला पण मोठं मंगळसूत्र करून द्यावं. आम्ही लग्नामध्ये साक्षीला जे काही दिलं ते सर्व ते मागतील अशी जर कल्पना असती तर आम्ही हिला हार घातलाच नसता. कारण हे दागिन आई-वडिलांकडून दिले जातात. तिच्या आई-वडिलांनी हिला काहीच दिले नाही. साधे नवरीला कानातलेही आई-वडिलांनी घातले नाहीत. साक्षीच्या वडिलांनी लग्नात फोटो काढताना बरोबर सर्व दागिने एकत्र ठेवलेल्याचा एक वेगळाच फोटो अगोदरच काढून ठेवला होता, जो फोटो ते आता घटस्फोट घेताना कोर्टाला दाखवत होते आणि याची जराही कल्पना तन्मयच्या घरच्या लोकांना नव्हती.

तन्मयच्या घरातील लोकांना फार जीवाला लागलं होतं की त्यांचा मुलगा बाहेरगावी नोकरी करत होता. कष्ट करून त्याने सर्व कमावलं होतं. थोडे थोडे पैसे देऊन दागिने बनवले होते आणि दोन महिन्याच्या संसारात साक्षी सर्व घेऊन चालली होती.

लग्नाच्या वेळी नवरीला किती दागिने घालायचे आणि किती घालू नये हे पूर्णपणे सासरच्या मंडळीवर अवलंबून आहे. कारण ज्यावेळी घटस्फोट होतात त्यावेळेस स्त्रीधन घेतलं जातं. लग्नामध्ये स्वतःची श्रीमंती दाखवण्यापेक्षा भविष्याचा विचार करून स्त्रीधन घातलं गेलं पाहिजे. लग्नात खर्च करण्यापूर्वी या सत्य घटनेवरून बोध घ्या आिण सतर्क व्हा.

Comments
Add Comment