Sunday, December 14, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला राज्यातील खासदारांचा वर्ग!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला राज्यातील खासदारांचा वर्ग!

राजकीय परिस्थिती, विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल आढावा

नवी दिल्ली : दिल्ली येथील संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांची विशेष बैठक घेऊन संवाद साधला. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी विकासकामांचा आढावा घेण्यासह महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

दिल्ली येथे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एनडीएचे सर्व खासदार सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील एनडीएच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निवासस्थानी निमंत्रित केले होते. यावेळी नरेंद्र मोदींनी बैठक घेऊन खासदारांच्या कामांचा आढावा सुद्धा घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, भारती पवार, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, खासदार मेघा कुलकर्णी आदींसह इतर खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्रातील एनडीएच्या सर्व खासदारांसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी राज्यातील विकासकामे आणि परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासह ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर काम करीत पक्षाला संघटनात्मक बळकट करण्याचे निर्देश नरेंद्र मोदी यांनी दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली.

राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती, विविध योजनांचा होणारा लाभ, अतिवृष्टी आणि त्यानंतरचे मदत कार्य याची माहिती सुद्धा त्यांनी जाणून घेतली. राज्यातील उद्योग-व्यवसाय, मतदारसंघातील प्रमुख विकास कार्य, समस्या आदींची पंतप्रधानांनी खासदारांकडून माहिती घेतली.

संजय धोत्रेंच्या प्रकृतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अकोला लोकसभा मतदारसंघातील विकास कार्य, समस्या व अडचणी आदींची माहिती सुद्धा पंतप्रधानांनी घेतली. खासदार अनुप धोत्रे यांच्या अभ्यासुवृत्ती त्यांनी कौतुक केले.

मार्गदर्शनातून नवी ऊर्जा

पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे व प्रेरणादायी असते. त्यांच्या अविरत काम करण्याच्या जिद्दीतून सतत नवी ऊर्जा मिळते. मोदी यांनी महाराष्ट्रातील विकासकामे, योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची स्थिती, योजनांचा लाभ, राजकीय परिस्थिती आदींची माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment