Sunday, December 14, 2025

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण

मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या मुलुंड (पश्चिम) मधील नवीन इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले असून आता याचे लोकार्पणही होत आहे. राज्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाइन होणार आहे.

उपमुख्‍यमंत्री तथा मुंबई शहर जिल्‍ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार संजय दिना पाटील, स्थानिक आमदारमिहिर कोटेचा, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह आणि महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाचा प्रारंभ २ ऑक्टोबर १९५८ रोजी करण्यात आला होता. प्रारंभी २५ रुग्णशय्यांसह वैद्यकीय सेवा सुरु झाल्यानंतर काळानुसार रुग्णशय्यांची संख्या वाढली, वैद्यकीय सेवांचा विस्तारही झाला. पण, रुग्णालयाच्या दोन्ही इमारती मोडकळीस आल्याने सन २०१७ मध्ये या इमारती पाडण्यात आल्या होत्या. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा तीन ठिकाणी विभाजित करुन स्थलांतरित करण्यात आल्या. टी विभाग कार्यालयाजवळील विस्तारित इमारत, आर मॉलमधील ऍम्युनिटी इमारत तसेच शालेय इमारत यांचा यामध्ये समावेश होता.

यानंतर, रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम २०१९ मध्ये प्रत्यक्ष सुरु करण्यात आले. मुलुंड (पश्चिम) मध्ये कदमपाडा परिसरात सुमारे ९ हजार ७१२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर तळमजला अधिक दहा मजले अशी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. यामध्ये एकूण बांधकाम क्षेत्र हे सुमारे ५९ हजार ०४५ मीटर इतके करण्यात आले आहे. परिणामी रुग्णालयाची क्षमता आता ४७० रुग्णशय्या इतकी झाली आहे. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य सेवेसाठी ३१० रुग्णशय्या तर अतिविशेष सेवेसाठी १६० रुग्णशय्या राहणार आहेत. या सर्व रुग्णशय्या टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या देखरेखीखाली ही इमारत पूर्णत्वास आली आहे. सर्वसाधारण सेवेचा विचार करता, सद्यस्थितीत उपलब्ध ११० रुग्णशय्यांसाठी सर्व आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. यामध्ये वैद्यकीय, शल्यचिकित्सा, अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, नेत्र, बालरोग, त्वचाविकार, दंतरोग, रक्तदाब-मधुमेह, प्रयोगशाळा इत्यादी समाविष्ट आहेत. दुसऱ्या टप्प्यात ११५ रुग्णशय्या कार्यान्वित होतील. त्यामध्ये डीएनबी स्पेशालिटी वैद्यकीय तज्ज्ञांकडून सेवा पुरवण्यात येतील. तर तिसऱ्या टप्प्यात ८५ रुग्णशय्या कार्यान्वित होतील. त्यात डीएनबी सेवेचा विस्तार करुन स्त्रीरोग व प्रसूती सेवा पुरवली जाईल. येत्या सहा महिन्यात सीटी स्कॅन, एमआरआय, रक्त पेढी, डायलिसिस, आयसीयू, एनआयसीयू या सर्व सेवा सुरु करण्यात येणार आहेत. अतिविशेष आरोग्य सेवाही टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये कार्डियोलॉजी, कार्डिओव्हॅस्कुलर सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरो सर्जरी व इतर सुपर स्पेशालिटी सेवांचा समावेश राहणार आहे.

Comments
Add Comment