राजरंग : राज चिंचणकर
एखादा सिनेमा निर्माण होताना त्या कलाकृतीची निर्मितीवस्था विविध वळणे आणि आडवळणे घेऊन पूर्णत्वास जात असते. या निर्मितीवस्थेच्या दरम्यान अनेक गोष्टी घडत असतात. त्यातल्या अगदी काहीच गोष्टी जगासमोर येतात आणि बहुसंख्य घटना मात्र त्या निर्मितीवस्थेत गुंतून गेलेल्या अनेकजणांच्या मनात कायमस्वरूपी ठाण मांडून बसतात. एखादा सिनेमा निर्माण करायला प्रारंभ केल्यावर तो कधी पूर्ण होईल आणि मोठ्या पडद्यावर कधी येईल, हे नक्की कुणी सांगू शकत नाही. यात अनेक महिने, वर्षेही जातात आणि या काळात अनेक घटना त्या कलाकृतीच्या बाबतीत, पर्यायाने तिच्याशी संबंधित लोकांच्या आयुष्यात घडत राहतात. आता हे सर्व मांडण्यासाठी निमित्तमात्र ठरला आहे; तो एक मराठी सिनेमा...! या सिनेमाचे शीर्षक आहे, 'व्हिसल ब्लोविंग सूट' आणि ही थक्क करणारी कहाणी आहे; ती या सिनेमाच्या विस्तृत अवकाशाच्या बहुस्तरीय निर्मितीवस्थेची...!
भूत, वर्तमान आणि भविष्याला साक्षी ठेवत केलेला प्रवास, वैज्ञानिक कसोटीवर खरी उतरणारी आणि अनेक वर्षे संशोधन करून लिहिलेली संहिता, सर्व ऋतूंचे रागरंग, दिवसांचे सगळे प्रहर, अगणित पशुपक्षी, त्यांचे विविध मूड्स, लक्षावधी आवाज, समुद्राची दर क्षणाला बदलणारी गाज, आकाशाचे सतत बदलणारे अनेकविध रंग, सूर्याच्या असंख्य तऱ्हा, पंचतत्त्वे आणि हे सर्वकाही टिपण्यासाठी तीन वर्षे केलेले चित्रीकरण; ही अशी सगळी पार्श्वभूमी ज्या सिनेमाला आहे, तो सिनेमा विशेष असणार याबाबत शंका घ्यायला वावच उरत नाही. सिनेमाची हटके शैली, प्रत्येक फ्रेम भारून टाकणारे संगीत, अनेक लेअर्समध्ये भाष्य करणारे दिग्दर्शन, कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागे जवळपास पाचशे माणसांचा गोतावळा आणि इतके सगळे असूनही गेली अनेक वर्षे बाहेर कुणालाही, मराठी सिनेमाच्या विश्वात असे काही 'क्रिएशन' घडत आहे, याबाबत खबरही लागू नये अशी अवलंबलेली पद्धत; हे सर्वकाही थक्क करणारे आहे.
एकूणच या निर्मितीसाठी गेली तब्बल नऊ वर्षे घेतलेले प्रामाणिक कष्ट, संयमाची पराकाष्ठा, प्रसंगी आरोग्याचीही पर्वा न करता ऊन, वारा आणि पावसाला भिडलेले सिनेमातले कलावंत, सिनेमाशी संबंधित सर्वच विभागांनी घेतलेली अथक मेहनत आणि सिनेमा व वास्तव हा भेद संपून सिनेमाच्या माध्यमातून वास्तवदर्शी अनुभव यावा, तसेच पडद्यावर घडत असलेल्या सर्व घटनांना प्रेक्षकवर्ग प्रत्यक्ष साक्षीदार व्हावा; अशा केल्या गेलेल्या प्रयत्नांचा दृश्य परिणाम म्हणजे 'व्हिसल ब्लोविंग सूट' हा सिनेमा असल्याचे स्पष्ट होत आहे. या सिनेमाच्या बाबतीतली अजून एक लक्षणीय गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या इतक्या वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेच्या काळात या सिनेमाशी संबंधित काही सहकारी दिवंगत झाले आहेत. पण तरीही या सिनेमाच्या निर्मितीसोबत त्यांची पारलौकिक साथसोबत घट्ट आहे आणि ते सारेच एकरूप होऊन या सिनेमाला घडवत असल्याची भूमिका या सिनेमाच्या टीमकडून व्यक्त केली जात आहे.
या सिनेमासाठी संशोधन, कथा, पटकथा, संवाद, निर्माता आणि दिग्दर्शक अशी मोठी जबाबदारी रंगकर्मी ज्ञानेश्वर मर्गज सांभाळत आहेत. त्यांच्या या अनोख्या प्रवासाविषयी, खास 'राजरंग' कॉलमसाठी त्यांची भूमिका मांडताना ते म्हणतात, "आशा, मेहनत, संयम अशी सगळ्याचीच पराकाष्ठा लागलेला हा सिनेमा आहे; पण तरीही कायम आहे ती दुर्दम्य इच्छाशक्ती...! तिच्याच जोरावर सारे आरोप, अपमान, प्रसंगी शापही गिळून अत्यंत सावकाश, पण दृढतेने एक एक पाऊल पूर्णत्वाकडे टाकत हा सिनेमा तयार झाला आहे. आमचे हे प्रथम पुष्प सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या चरणी अर्पण करण्यात आले असून, त्यामागचे विशेष कारण हा सिनेमा पाहताना कळून येईल. नेहमीच्या धाटणीसारखा हा सिनेमा नाही. दृक-श्राव्य माध्यमाच्या सर्व शक्यतांना ३६० डिग्री आव्हान देत, मनोरंजन करणारा बहुस्तरीय आविष्काराचा आगळावेगळा प्रयोग यात केलेला आहे. हिंदी व मराठी मालिकांतून भूमिका केलेली, 'राधा' या नाटकात पाच वेगवेगळी पात्रे रंगवलेली अभिनेत्री विशाखा कशाळकर या सिनेमातून प्रमुख भूमिकेत पदार्पण करत आहे. या सिनेमाचे शीर्षक इंग्रजी का, हेही लवकरच उघडकीस येईल. हा सिनेमा म्हणजे लघुपट, माहितीपट किंवा एकपात्री प्रकार नाही; तर हा पूर्ण लांबीचा मराठी सिनेमा आहे".
एकूणच या निर्मिती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, धर्मवीर भारती यांच्या 'अंधायुग' या नाटकाच्या उद्घोषाला या कलाकृतीचा उद्देश मानत असल्याचे ज्ञानेश्वर मर्गज सांगतात. 'एक नशा आहे, अंधाराच्या गर्जणाऱ्या महासागराला सामोरे जाण्याची, पर्वताएवढ्या उठलेल्या लाटांशी रिक्त हातांनी झुंज देण्याची, अथांग तळ गाठत रसातळाला जाण्याची आणि मग स्वतःला सर्व संकटांत ढकलत मिळालेले आस्थेचे, प्रकाशाचे, सत्याचे, मर्यादेचे काही कण गोळा करून, प्राणापलीकडे जपत, वाचवित त्यांना धरतीवर, सर्वांसमोर आणण्याचे साहस करण्याची नशा...! या नशेत खोल वेदना आणि तितकाच तीव्र, चटका देणारा आनंद मिसळलेला असतो; ज्याच्या आस्वादासाठी मन अक्षरशः अगतिक होऊन जाते, अशा या नाटकाच्या उद्घोषाला प्रमाण मानत ज्ञानेश्वर मर्गज पुढे म्हणतात, "जगासमोर नसलेले रहस्य गोताखोर वृतीने शोधून ते प्रेक्षकांसाठी आमच्या पहिल्यावाहिल्या सिनेमाच्या रूपात साकार करण्याची महत्त्वाकांक्षा आमची निर्मितीसंस्था व्यक्त करते. ध्वनी आणि दृश्य यात घडवलेल्या बहुस्तरीय अनोख्या आविष्काराच्या व्यतिरिक्त या सिनेमाच्या कथेचा आवाका खूप विस्तृत आहे. निर्मिती प्रक्रियेतले अडथळे दूर करत आता शेवटच्या टप्प्यात हा सिनेमा पोहोचला आहे. हा सिनेमा पाहताना कान आणि डोळ्यांसोबतच मेंदूलाही खऱ्या अर्थाने प्रेक्षक व्हावे लागेल".






