Saturday, December 13, 2025

मालवणी महोत्सवातून अर्थप्राप्ती

मालवणी महोत्सवातून अर्थप्राप्ती

रवींद्र तांबे

कोकणातील मालवणी महोत्सव प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी जिल्ह्यांत स्थानिक नेते आयोजित करतात. यामुळे कोकणातील दशावताराला सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. मात्र त्यांच्या अनुदानात वाढ होणे गरजेचे आहे. कोकणी माणूस कोकणची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो.

कोकणातील मालवणी महोत्सवाचा विचार करता इतर जिल्ह्यात मागील ३५ वर्षांपासूनचे आयोजन केले जाते. यामुळे कोकणातील मालवणी संस्कृती, विविध खाद्यपदार्थ आणि दशावतार नागरिकांपर्यंत पोहोचवून रिकाम्या हाताना काम व रोख उत्पन्न मिळते. यातून कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तेव्हा आयोजित करण्यात येणाऱ्या मालवणी महोत्सवासाठी नागरिक मोठ्या संख्येने आकर्षित कसे होतील त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे. तसेच स्टॉलधारकांनासुद्धा सवलती मिळायला हव्यात. यामुळे कोकणी खाद्यपदार्थ अगदी कमी किमतीत लोकांना मिळू शकतात. याचा परिणाम खाद्यपदार्थांना मागणी वाढल्याने चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती होऊ शकते. मालवणी महोत्सव हा कोकणापुरता मर्यादित राहिला नसून आता कोकणाबाहेर जाऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन देत आहे. त्यामुळे कोकणातील खाद्यपदार्थांची चव देशविदेशातील नागरिकांना चाखायला मिळत आहे. यामुळे इथल्या खाद्यपदार्थांना बऱ्यापैकी चांगले दिवस आलेले दिसतात. मालवणी महोत्सवामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत असून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तेव्हा हंगामात महोत्सव आयोजित न करता वर्षातून किमान तीन ते चार वेळा मालवणी महोत्सव आयोजित करण्यात यावा. म्हणजे अधिक आर्थिक बळ मालवणी महोत्सवातून कोकणी माणसाला मिळेल. यातूनच कोकणी माणसाला चांगल्याप्रकारे अर्थप्राप्ती होऊन आपला आर्थिक विकास साधू शकतात. यासाठी कोकणातील कोकणी माणसाने आपापसातील वाद बाजूला सारून मालवणी महोत्सवामध्ये सहभागी झाले पाहिजे.

कोकणात पर्यटन महोत्सवाबरोबर मालवणी महोत्सव सुद्धा कोकण विकासाचे योग्य पाऊल समजले जात आहे. त्यामुळे बऱ्यापैकी अर्थप्राप्ती कोकणी माणसाला होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, स्थानिक लोकांच्या रिकाम्या हातांना काही दिवस काम मिळत असून, महाराष्ट्र शासनाच्या महसुलात वाढ होत आहे. वाहतूकधारांना सुद्धा त्याचा चांगला फायदा होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी त्यांना शासनस्तरावर पुरेसे अनुदान मिळणे गरजेचे आहे. प्रामुख्याने मालवणी महोत्सव केव्हा सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी मागील २८ वर्षे हा मालवणी महोत्सव दरवर्षी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये बोरिवलीतील भोसले मैदानाच्या प्रांगणात सुरू असतो. सन २०२५ साली बोरिवलीमध्ये मालवणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. त्याचे २८ वे वर्षे होते. तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी मालवणी महोत्सव ऑक्टोबर ते मे महिन्यात आयोजित करण्यात येतो. यामध्ये कोकणी संस्कृती व कोकणातील खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात येतात. जवळजवळ एका ठिकाणी दहा ते बारा दिवस महोत्सव सुरू असतो. मात्र, त्याचे भाडे दीड ते दोन हजार रुपये एका स्टॉलमागे असते. काही ठिकाणी कोकणातील उद्योजकाकडून भाडे घेत नाहीत. मात्र, येण्या-जाण्याचा वाहतूक खर्च, टोल आणि हमालीमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढवावे लागतात. त्यामुळे कोकणात जी खाज्याची पुडी पंचवीस रुपायाला मिळते त्या पुडीला सत्तर ते ऐंशी रुपये द्यावे लागतात. असे असले तरी बऱ्याच वेळा पावसाचे सावट किंवा अचानक पाऊस आल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे कोकणी माणसाबरोबर आयोजक सुद्धा चिंतेत असतात. अशा वेळी त्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय स्तरावर आर्थिक मदत मिळणे गरजेचे असते. ज्या ठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो, त्या ठिकाणच्या महानगरपालिकेला महसूल द्यावा लागतो. तशी त्यांनी सुद्धा नुकसानभरपाई दिली पाहिजे. कारण त्यांचीच परवानगी घेऊन त्यांनाच अनामत रक्कम भरावी लागते. तेव्हा त्यांनी स्टॉल व इतर सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजेत. जेणेकरून माल सुरक्षित राहिला पाहिजे. तसेच मालवणी महोत्सवाची जाहिरात करायला हवी. म्हणजे मोठ्या प्रमाणात नागरिक येऊ शकतात.

कोकणातील मालवणी महोत्सव प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी जिल्ह्यांत कोकणातील स्थानिक नेते आयोजित करतात. यामुळे कोकणातील दशावताराला चांगले दिवस आलेले आहेत. मात्र त्यांच्या अनुदानात वाढ होणे गरजेचे आहे. कोकणी माणूस कोकणची संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतो. ज्याठिकाणी मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येतो, त्याठिकाणी कोकणातील एका मंदिराची प्रतिकृती तयार केली जाते. पारंपरिकरीत्या गाऱ्हाणे घालून उद्धाटन करण्यात येते. कोकणातील पारंपरिक वाजंत्री आपली कला उत्तम प्रकारे सादर करतात. मंदिरात पालखी ठेवण्यात येते. दर दिवशी रात्री आठ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जातात. त्यात मंदिराच्या तिन्ही बाजूने कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध असते. यामध्ये समुद्रातील मासे आणि विविध गोड पदार्थ स्टॉल्समध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. यात कोंबडी वडे लोक आवडीने खातात. तर लहान मुले तळलेल्या माशांवर ताव मारतात. त्यानंतर सुखी मासळी, कडकडे लाडू, मालवणी खाजा, कुळदाचे पीठ, कोकम, उकडे तांदूळ इत्यादींची विक्री झाल्याने रोख पैसा मिळतो. यामध्ये पारंपरिक हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या बांबूच्या वस्तूंना बऱ्यापैकी मागणी असते. त्यात सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना चांगले दिवस येत आहेत. याचा परिणाम पारंपरिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. यात मालवणी मसाला भाव खात आहे. यामुळे नागरिकांची संख्या महोत्सवामध्ये वाढत आहे. याचा फायदा कोकणातील व स्थानिक हॉटेल्सधारक, छोटे स्टॉलधारक व इतर व्यवसायिक यांच्या रोख उत्पन्नात वाढ होत आहे. तेव्हा मालवणी महोत्सवाला अधिक गती येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण कोकणातील मालवणी महोत्सव हा केवळ सांस्कृतिक महोत्सव नसून कोकणच्या अर्थव्यवस्थेला चांगली गती देणारा महोत्सव असल्याने मालवणी महोत्सवातून अर्थप्राप्ती होणार आहे. त्यासाठी मालवणी महोत्सवाला शासनस्तरावर प्रोत्साहन मिळणे तितकेच आवश्यक आहे.

Comments
Add Comment