त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव (बरड्याची वाडी) येथील एका महिलेने आपल्या पोटच्या सहा मुला–मुलींची केवळ पैशासाठी विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हलाकीच्या परिस्थितीमुळे तिने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
आर्थिक गरज मनुष्याला काय करण्यास भाग पाडेल याचा अंदाज बांधता येत नाही. घरातील बिकट आर्थिक स्थितीमुळे असे कृत्य घडल्याचे उदाहरण या घटनेतून समोर आले आहे. तब्बल १४ अपत्यांना जन्म देणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने फक्त १० हजार रुपये मिळवण्यासाठी एका बाळाची विक्री केली असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे एकूण सहा बालकांची विक्री केल्याचेही उघड झाले आहे.
या परिसरात अशाप्रकारच्या आणखी काही घटना झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






