Wednesday, December 10, 2025

नवसंजीवन...

नवसंजीवन...

माेरपीस : पूजा काळे

यशाकडे जाणारा मार्ग खडतर असला, तरी अथक परिश्रमाला पर्याय नसतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे या उक्तीप्रमाणे कठोर मेहनतीच्या साक्षीने प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा जाग करता येतं एवढी ताकद प्रयत्नांत असते. सडेतोड प्रयत्न करणाऱ्याला अपयशाचे काळे ढग अडवू शकत नाहीत या संदर्भाततली एक कथा...

पलीकडून फोन खणाणला, “हॅलो डॉ. आनंद आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचंय... मी सुमेधा बोलतेय. समोरून होल्डवर ठेवण्याइतपतही सुमेधाला उसंत नव्हती. जणू काही स्वतः डॉक्टर तिच्याशी बोलत असावेत. काडीचाही वेळ न दवडता सुमेधा बोलत होती. हॅलो डॉक्टर... माझा..

माझा सुहास, आज अंथरुणात उठून बसला. अकल्पित घडलंय सगळं. चमत्कार झालाय डॉक्टर... चमत्कार ... हे केवळ आपल्यामुळं शक्य झालंय. तिला झालेला आनंद पोटात मावत नसावा, कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बोलण्यातून व्यक्त होत होता. सुमेधा सुरेशाच्या लग्नानंतर तब्बल दोन वर्षानं सुहासरूपी बाळ जन्माला आलं होतं. नावाप्रमाणं गोंडस, गुटगुटीत, हुशार आणि चाणाक्षही. त्याच्या बाळलीला पाहताना त्यांचे डोळे भरून येत. मुलाच्या वाढत्या वयाबरोबर आयुष्यातला आनंद द्विगुणित करणारे अनेक प्रसंग हे दोघे, त्याच कुटुंब अनुभवत होते. या त्रिकोणी कुटुंबाचं आपलं आपलं मस्त चाललेलं पाहून शेजारच्यांनाही त्यांचा हेवा वाटे.

सुहास घडत होता. मोठा होत होता. एकेदिवशी शाळा सुटून कॉलेज पर्वात प्रवेश करण्याच्या काही दिवस आधी शेजारच्या इमारतीतील एका वृद्ध दांम्पत्याला रस्ता ओलांडून देताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं होतं. काळाने घाला घातला होता. वृद्ध जागच्या जागी गतप्राण झाले आणि सुहास मानसिकता हरवून बसला ती कायमचीच. डोक्याला मार लागून फ्रॅक्चर झाल्यानं तो जखमी झाला होता. पुढे दवाखाना, औषधोपचार, डॉक्टरी सल्ले सगळं ओघाने आले. पण म्हणून कशाचीच उतराई होत नव्हती. दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या तब्येतीमुळे सुहास जास्तीत जास्त अंथरुणात खिळून राहू लागला. डोक्याला जबरी मार लागलेला, कोमात गेलेला मुलगा बाहेर येईल का? कधी येईल? किती काळ लागेल? या गर्तेत कुठलीच दिशा सापडत नव्हती. मात्र सुमेधाच्या दैनंदिन पूजाअर्चा, नैवेद्य, प्रसाद लावणं वाढलं होतं. मुलाचं अपंगत्व सहन करण्याची ताकद असलेले दोघे त्याच्या मानसिक दुखण्याने त्रस्त होते. दिवस सरले, महिने उलटले तरी सुहासमध्ये म्हणावा तितका फरक पडला नव्हता. दरम्यान सुहासचा एस.एस.सी.चा रिझल्ट लागला. यामध्येही हुशार सुहास चांगल्या गुणांनी पास झाला, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. त्याच्या बाबतीत नियतीने काही वेगळं लिहून ठेवलं होतं. महिने उलटले. चौकशीला येणाऱ्या लोकांची संख्याही रोडावली. बिछान्यातलं जगणं हेच सुहासचं आयुष्य बनलं. मात्र थकले नव्हते ते सुरेश आणि सुमेधा. मुलाचं करताना लाखो हत्तीचं बळ कुठून आणत होते कुणास ठाऊक! तरी डॉक्टरांकडून मिळत असलेला धीर मोलाचा होता. औषधांच्या परिणामापेक्षा कुटुंबाला मानसिक आधार देण्याचं काम डॉ. आनंद नेमाने करत होते.

महिने झाले तरी सुहासचं आजारपण बरं होण्याची चिन्हं नव्हती. कोमात असलेला माणूस बरा होऊन पूर्ववत व्हायला डॉक्टरी भाषेत अवधी लागतो, तो किती? आणि कसा? ते येणारी वेळच ठरवणार होती. या जंजाळात सुमेधाच्या आर्थिक परिस्थितीचं कंबरडं मोडलं होतं. त्यांचं होत नव्हतं ते सगळं दिर्घ आजारपणात गेलं. उरली होती, ती मुलाच्या बाबतीतली उदासीनता. ही उदासीनता घेऊन डॉक्टरी सल्ल्याने, खिन्न मनाने सुमेधा सुरेशनं सुहासला घरी आणण्याचा निर्णय घेतला. यापुढचं त्याचं विश्व, हे घर आणि घराच्या खिडकीला लागून असलेल्या भल्या मोठ्या वृक्षाच्या छायेखाली जाणार होतं. दरम्यान कितीतरी उन्हाळे, पावसाळे आले आणि गेले. विशीच्या आसपास असलेला तरणाबांड सुहास शरीर आणि मनाने मात्र थंड पडलेल्या कलेवरासारखा भासायचा. एकटक खिडकीतून बाहेर पहाताना त्याची नजर कोणाची तरी वाट पाहताना दिसे. दर दिवशी पहाटसमयी चिमण्यांचा जागर, कोकीळ बोली, पक्षांचा किलबिलाट या गोष्टी त्याच्या कानी पडत. चमत्कारिक ओढ लावणाऱ्या या गोष्टीत त्याचं मन रमे. पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही, तर सुहासची नजर त्यांना शोधत राही.

डोळ्यांतून पाणी येऊ लागे. या आणि अशा बऱ्याच गोष्टींची सुमेधा नोंद घेत होती. एव्हाना पानगळ सरून नवी पालवी फुटलेली. पक्षांनी सुद्धा काड्या गोळा करून घरट्यात अंडी घालायला सुरुवात केलेली. त्यातल्याच एका पक्षाचं पिल्लू खिडकीत येऊन बसे. त्याची चिवचिव, हालचाल याने सुहासचं लक्ष विचलित होई. दिवस दिवस हा खेळ चालत असे. पण एके दिवशी ते पिल्लू खिडकीत आलंच नाही. तेव्हाची सुहासची तगमग तिने अनुभवली होती. त्याचा श्वास, बोटांची हालचाल विलक्षण वाढली होती. डोळे भिरभिरत होते. या क्रमात अचानक बदल होऊन सुहास बिछान्यात उठून बसलेला दिसला. हे पाहताच सुमेधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पानाफुलांत भिरभिरणाऱ्या चिमुकल्या पक्षी जागराचा की औषधोपचारांचा परिणाम होता ठाऊक नाही, पण दैवी चमत्कार घडला होता. सुमेधाला हे सारं जाणून घ्यायचं नव्हतच मुळी. या क्षणी डॉ. आनंद यांना ही बातमी देऊन कृतकृत्य करायचा विचार तिने केला आणि फोन उचलला. हॅलो डॉ. मी सुमेधा बोलतेय. डॉक्टरांशी भडाभडा बोलून सुमेधा रड रड रडली. हे रडणं मागे सरलेल्या आयुष्यासाठी नव्हतं तर ते नव्यानं पुढे येणाऱ्या सुहासच्या स्वागतासाठी होतं. या प्रकरणात मी एक समजून चुकले की, मनापासून शर्थीचे प्रयत्न केले असता, चिकाटी, सातत्य शिकस्त मेळ साधतात. अचूक प्रश्नाला बिनचूक उत्तर सापडतात आणि उत्तरादाखल शेवट गोड होतो.

Comments
Add Comment