पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना उडवले होते. अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याआधी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळासाठी सेवेतून निलंबित केले होते.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना पोर्शे अपघात प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांचा पोलीस दलातील कार्यकाळ संपला आहे, त्यांना निवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ मिळणार नाही. निवृत्ती वेतनासाठी पण हे दोघे अपात्र झाले आहेत. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताची माहिती वरिष्ठांना न कळवणे. सुरुवातीचा तपास करताना गंभीर स्वरुपाच्या त्रुटी ठेवणे असे गंभीर आरोप बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांवर असल्याचे वृत्त आहे.
पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी आधी १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाला अटक केल्याचे जाहीर केले. सध्या हा मुलगा जामिनावर आहे. बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला फक्त १४ तासांत १०० शब्दांचा निबंध तसेच 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन दिला.