मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.
लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत्या. वयोमानानुसार प्रकृती ढासळल्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या स्वभावाने शांत, स्नेहशील आणि धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कदम कुटुंबातील अनेक सदस्य सामाजिक कार्यात पुढे आले.
मृत्युसमयी त्यांच्या मागे चार मुलांसह सुना, जावई, नातवंडे, पतवंडे आणि मोठा परिवार आहे. लिलाबाई कदम यांच्या निधनाबद्दल स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या जाण्यामुळे कदम कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.






